अखेर भिसेगावकरांनी भागविली पाण्याच्या टँकरने आपली तहान !

0
132

बिल्डरांचे चोचले पुरविताना स्थानिकांच्या घशाला कोरड , पालिकेचा अजब कारभार..

भिसेगाव- कर्जत(सुभाष सोनावणे )सध्या कर्जत शहरातील भिसेगाव – गुंडगे -प्रभागातील नवीन एस.टी. स्टँड कडील जाणारा परिसर , जुने एस टी स्टँड , विश्वनगर या परिसरात पाण्याची बोंबाबोंब चालू असून कर्जत नगर परिषदेकडे याबाबतीत ढिगभर तक्रारी करूनही या गंभीर प्रश्नाकडे सत्ताधारी व लोकप्रतिनिधी लक्ष देत नसल्याने येथील राधाकृष्ण अपार्टमेंट मधील रहिवासी वर्गाने अखेर विकतचे पाणी टँकरद्वारे आणण्याची वेळ आली आहे.

त्यामुळे बिल्डरांचे चोचले पुरविताना स्थानिक रहिवासी वर्गाच्या घशाला मात्र कोरड पडलेली पालिकेला दिसत नसल्याने येथील महिला वर्गात संताप खदखदत आहे.कर्जत पाणी पुरवठा योजनेला २० वर्षांचा कालावधी उलटून गेला आहे . कर्जत पश्चिम भाग असलेल्या भिसेगाव – जुने एस.टी. स्टँड परिसरात भरमसाठ इमारती बांधल्या गेल्या आहेत. मात्र पाण्याची टाकी तीच व तिची क्षमता वाढलेली नाही.” अरिहंत अलोकी ” या मुंबईच्या विकासकांच्या प्रोजेक्टमध्ये ४०० फ्लॅट तर ” राधा गॅलक्सी ” या भल्या मोठ्या इमारत प्रोजेक्टमध्ये देखील शेकडोने फ्लॅट झाल्याने त्यांना पालिकेने मेन पाणी लाईनला सप्लाय दिल्याने पाण्याचा फोर्स तिकडे वळाल्याने स्टँड परिसरात कमी दाबाचा व कमी धारेने पाणी येत आहे.

याबाबतीत कर्जत नगर परिषदेला वारंवार येथील महिलांनी तक्रारी करूनही महिलांची मुख्य पाणी समस्या असताना मुंबई स्थित बिल्डरांना २४ तास पाणी या योजनेला हातभार लावून सत्ताधारी परिसरातील महिलांच्या घशाला कोरड आणत आहेत.म्हणूनच आज त्यांना टँकरने विकत पाणी आणण्याची वेळ आली आहे. कर्जत नगर परिषदेत करोडो रुपयांचा निधी येत असताना पाण्याची समस्या अजूनही जैसे थे असल्याचे चित्र येथे पहाण्यास मिळत आहे.या परिसरात वाढीव पाण्याची साठवण टाकीची गरज असताना या नियोजनाकडे कुणीच गांभीर्याने विचार करत नाहीत.

सकाळी व संध्याकाळी देखील पाणी मिळणार हि स्वप्ने दाखवीत सत्तेवर बसलेले सत्ताधारी पाण्याच्या या गंभीर समस्येकडे महिलांनी तक्रारी केल्यावर हि थातुरमातुर उत्तरे देऊन वेळ काढत असल्याने भविष्यात पाणी प्रश्न सुटणार की नाही ? कि पालिकेची भरमसाठ पाणीपट्टी भरून आम्हाला कायम विकतचे पाणी घ्यावे लागणार का ? असा संतापजनक सवाल महिलावर्ग करत आहेत.अरिहंत टॉवरला बेकायदेशीर नियमबाह्य मोठी पाणी सप्लाय दिलेली असल्याने या परिसरात पाण्याची गेली दोन महिने पासून बोंबाबोंब चालू असताना अद्यापी कुठलेच नियोजन नसल्याने सत्ताधारी पक्षांची प्रतिमा मलिन होत असल्याचे चित्र येथे पहाण्यास मिळत आहे.