धुलीवंदन खेळून हात पाय धुण्यासाठी इंद्रायणी नदीपात्रात गेलेल्या आंबी येथील अभियांत्रिकी विध्यार्थ्याचा पाण्यात बुडून मृत्यू…
मावळ (प्रतिनिधी):जिल्ह्यात धुलिवंदनाचा सण उत्साहात साजरा केला जात असताना मावळातील वराळे येथे दुर्दैवी घटना घडली. मित्रांसोबत धुलिवंदन खेळून रंग धुण्यासाठी इंद्रायणी नदीवर गेलेल्या एका तरुणाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण मावळात हळहळ व्यक्त होत आहे.
जयदीप पुरुषोत्तम पाटील (वय-21 रा. तारखेडा, पाचोरा, जि. जळगाव) असे मृत्यू झालेल्या तरुणाचे नाव आहे. ही घटना मंगळवार दि. 7 रोजी दुपारी वराळे येथे घडली.
जयदीप हा आंबी येथील डॉ. डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयातील तिसऱ्या वर्षात शिकत होता. मंगळवारी दुपारी 12:30 वा.च्या सुमारास सात ते आठ विद्यार्थी रंग खेळले. त्यानंतर सर्वजण वराळे हद्दीतील इंद्रायणी नदीवर हातपाय धुण्यासाठी गेले. हातपाय धुवत असताना जयदीप याचा पाय घसरला आणि तो पाण्यात पडला.याबाबत जयदीपच्या मित्रांनी तळेगाव एमआयडीसी पोलिसांना माहिती दिली.
त्यानंतर दोन तासांच्या शोधमोहिमेनंतर बचाव पथकाने बोटीच्या साहाय्याने जयदीपचा मृतदेह बाहेर काढला. घटनेचा पुढील तपास तळेगाव एम आय डी सी पोलीस करत आहेत.