आई एकविरा देवी यात्रा काळात कार्ला परिसरात दारू बंदी व 144 चे निर्बंध लागू…

0
260

कार्ला : महाराष्ट्रातील जागृत देवस्थान व लाखो भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कार्ला गडावरील आई एकविरा देवीची चैत्री यात्रा व मानाचा पालखी सोहळा 8 एप्रिल रोजी कार्ला गडावर संपन्न होणार आहे .

या यात्रेत मुंबई पुणे या भागातून अनेक आग्री कोळी व कोळी समाजाचे लाखो भाविक तसेच पुणे जिल्ह्यातील भाविक मोठया संख्येने दर्शनासाठी येण्याची शक्यता लक्षात घेता प्रशासनाकडून मोठी तयारी करण्यात आली असून भाविकांना सुलभतेने व पारंपारिक पद्धतीने निर्विघ्नपणे दर्शन मिळावे यासाठी प्रशासनाचे सर्व विभाग दक्ष असतील अशी माहिती मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांनी आज एकविरा गडावर आयोजित बैठकीत दिली आहे.

कोरोनामुळे मागील दोन वर्ष देवीची यात्रा झाली नव्हती परंतु यावर्षी कोरोनाचे निर्बंध हटल्याने कार्ला गडावर देवीच्या दर्शनासाठी भाविकांची मोठी गर्दी होण्याची शक्यता असून या गर्दीमध्ये कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये याकरिता पुणे जिल्हाधिकारी यांनी कार्ला परिसरात भादवी कलम 144 लागू केले आहे.तसेच यात्रेचे मुख्य दिवस असलेल्या दि . 7 , 8 व 9 एप्रिल रोजी कार्ला , वेहेरगाव , वाकसई , मळवली , वरसोली परिसरात दारुबंदीचे आदेश लागू केले आहेत . गडावर शोभेची दारु व फटाके घेऊन जाणे , वाजविणे , कोंबड्या , बकरे घेऊन जाणे , बळी देणे अशा प्रकारांना बंदी घालण्यात आली आहे .

तसेच यात्रेचे मुख्य दिवस असलेल्या चैत्र शुध्द षष्टीला दि.7 माहेरघरी म्हणजेच देवघर येथे संध्याकाळी 8 वाजता देवीचा भाऊ अर्थात बहीरी देवाचा पालखी सोहळा , चैत्र शुद्ध सप्तमीच्या दिवशी दि.8 सायंकाळी 7 वाजता कार्ला गडावर आई एकविरा देवीचा मुख्य पालखी मिरवणूक सोहळा वाजत गाजत आनंदीमय वातावरणात सुरु होणार आहे . अष्टमीच्या पहाटे 3 वाजता देवीचा तेलवणाचा व त्यानंतर मानाचा कार्यक्रम होणार असल्याची माहिती देवीचे मुख्य पुजारी संजय गोविलकर यांनी दिली . याव्यतिरिक्त देवीचे सकाळ , दुपार व संध्याकाळची नित्य पुजापाठ नियमानुसार होणार आहे.

यात्रा काळात पोलीस प्रशासनाकडून कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी 50 अधिकारी , 300 पोलीस कर्मचारी , स्ट्रायकिंग फोर्स , कमांडो , स्वंयसेवक असा बंदोबस्त असणार असून कार्ला फाटा ते मंदिर दरम्यान चार टप्प्पात बंदोबस्त लावण्यात येणार असल्याची माहिती पोलीस उपअधीक्षक राजेंद्र पाटील व पोलीस निरीक्षक प्रविण मोरे यांनी दिली. त्याच बरोबर याठिकाणी वाहतुकीची व्यवस्था करत पार्किंगसाठी परिसरातील 14 जागा निश्चित करण्यात आल्या आहेत .

यावेळी बैठकीला मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांच्यासह लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाटील ,लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक प्रविण मोरे , कार्ला मंडल अधिकारी माणिक साबळे , तलाठी मीरा बोऱ्हाडे , वन विभागाचे प्रमोद रासकर , विज वितरण कार्ला विभागाचे उपअभियंता अक्षय पवार , श्री एकविरा देवस्थानचे व्यवस्थापक मंगेश गायकवाड , पोलीस पाटील अनिल पडवळ यांच्यासह कार्ला आरोग्य विभागाचे प्रतिनिधी , दुकानदार , देवस्थानचे कर्मचारी , भारतीय पुरातत्त्व विभागाचे कर्मचारी व स्थानिक व्यवस्थापक उपस्थित होते.