आगीत झोपड्या जळून खाक झाल्याने शिळिंब येथील दोन आदिवासी कुटुंब बेघर…

0
111

पवना नगर : डोंगराला लागलेल्या वणव्यात आदिवासी कातकरी कुटुंबाच्या दोन झोपडया भस्मसात झाल्याची दुर्दैवी घटना शिंळीब गावात घडली आहे.

डोंगराला वणवा लागल्यामुळे शिंळीब ( ता . मावळ ) येथील दोन आदीवासी कातकरी कुटुंबाच्या झोपडया भस्मसात झाल्या आहेत. झोपडीतील सर्वजण गावामध्ये मजुरीसाठी गेले असल्याने सुदैवाने या आगीत कुठल्याही प्रकारची मनुष्यहानी झाली नाही. मात्र झोपड्या पूर्णपणे जळून खाक झाल्या आहेत. तसेच दोन कुटुंबाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून कुटुंबातील अनेक सदस्य रस्त्यावर आले आहेत.

शिंळीब गावातील आदिवासी कातकरी कुटुंबातील दत्ता नथू वाघमारे व लहु हरीचंद्र घोगरे यांच्या झोपड्या आगीत जळून खाक झाल्या आहेत. या आगीत दोन्ही कुटुंबाचे काही हजाराचे नुसकान झाले आहे . यामध्ये कुटुंबातील सर्व सदस्यांची ओळखपत्र , आधारकार्ड , रेशनकार्ड आदी महत्वाची कागदपत्रे जळून खाक झाली आहेत. तसेच काही धान्याचे देखील नुकसान झाले आहे.

हाताला मिळेल ते काम करून पोटाची खळगी भरणाऱ्या आदिवासी कातकरी कुटुंबांची ऐन पाडव्याच्या सणाला झोपडी जळून खाक झाल्याने कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे . त्यामुळे परिसरातील नागरिकांनी या दोन्ही कुटुंबियांना मदतीचा हात पुढे करावा , असे आवाहन आदिवासी कुटुंबातील सरपंच सारिका दिपक घोगरे , करंज ग्रामपंचायत सदस्य संतोष जाधव यांनी केले आहे . या जळीत झोपड्यांचा व झालेल्या नुकसानीचा काले मंडल अधिकारी प्रकाश बलकवडे , शिंळीब गाव कामगार तलाठी राम बाचेवाड व पोलीस पाटील सचिन बिडकर यांनी पंचनामा करुन शासकीय मदतीसाठी अहवाल पुढे पाठवला आहे.