आदर्श सरपंच सौ.प्रमिला बोराडे यांच्या हस्ते हालीवली ग्रामपंचायत येथे ध्वजारोहण..

0
43
भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे )आज समाजात लोकांना स्वार्थ आणि पैसा यापलीकडे काहीही दिसत नाही. अनेक भौतिक सुविधांबरोबरच देशाची एकता, अखंडता,परस्पर बंधुभाव, सहकार्य, सहिष्णुता, देशभक्ती, देशप्रेम, निस्वार्थता, त्याग इत्यादि नितीमुल्यांची शिकवण देणे हि काळाची आणि देशाची गरज बनली आहे. फक्त वर्षातुन दोनवेळा राष्ट्रीय सण साजरे करुन, कार्यक्रम करून उपयोग नाही तर या नितीमुल्यांची जोपासना समाजात खोलवर रूजविण्यासाठी वर्षभर अशा कार्यक्रमांचे आयोजन करण्याची गरज आहे.अन्न – वस्त्र – निवारा या माणसाच्या मुलभुत गरजा आणि जगणे अधिक सुखकर व्हावे,आरामदायक व्हावे यासाठी आपण गावपातळीवर रस्ते,गटार,पाणी,वीज इत्यादी सुविधा पुरवित असतो.
परंतु माणसाला इतर प्राण्यांपेक्षा जे वेगळेपण, निराळेपण ज्या भावभावनांमुळे,ज्या नैतिक मुल्यांमुळे माणसाला माणुसपण मिळाले आहे. या नरदेहाला श्रेष्ठत्व प्राप्त झाले ती माणुसकी टिकविण्यासाठी, हा देश त्याची अखंडता टिकविण्यासाठी,इथले संस्कार आणि संस्कृती चिरंतर राखण्यासाठी शासकीय पातळीवरुन प्रयत्न होण्याची नितांत गरज आहे.” माणसा माणसा माणुस बन “.देशप्रेम, देशभक्ती हि मनात ओतप्रोत भरलेली असेल तर ते व्यक्त करण्यासाठी कोणत्याहि गोष्टीचे बंधन आपणास अडवू शकत नाही.
देशासाठी, समाजासाठी करण्यासारखे खुप आहे , परंतु करण्याची तळमळ पाहिजे ,असा उद्दात हेतू मनाशी बाळगून समाजात काम करणाऱ्या माणुसकीच्या समाजसेवक , हालीवली ग्रामपंचायत सरपंच सौ.प्रमिला सुरेश बोराडे यांच्या शुभहस्ते येथे ध्वजारोहण करण्यात आले.देशाच्या ७३ व्या प्रजासत्ताक दिनानिमित्ताने सरपंच सौ.प्रमिला सुरेश बोराडे यांच्या हस्ते हालिवली ग्रामपंचायत येथे छत्रपती शिवाजी महाराज व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करण्यात आले,तसेच त्यांच्या हस्ते ग्रामपंचायत येथे ध्वजारोहण करण्यात आले.ध्वजाला सलामी देऊन राष्ट्रगीत,ध्वजगीत म्हणण्यात आले.
तसेच म्हात्रे सर यांनी संविधानाचे वाचन केले. ग्रामपंचायतीच्या वतीने जमलेल्या ग्रामस्थ,विद्यार्थी यांना खाऊचे(चाकलेट)वाटप करण्यात आले.तालुक्यातुन एक आदर्श शिक्षिका म्हणून काम केलेल्या सरपंच सौ .प्रमिला बोराडे सध्या जरी राजकारणात असल्या तरी त्यांच्या भोवती नेहमीच लहान मुलांचा, विद्यार्थ्यांचा गराडा असतो तो त्यांच्यातील उपक्रम शिक्षिका आजहि जागृत आहे म्हणूनच.गावात शिवजयंती उत्सवामध्ये सर्वप्रथम सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्याची कल्पना त्यांनी अंमलात आणली आणि कार्यक्रमाची शोभा वाढविली.
आजहि प्रजासत्ताक दिनाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांसोबत स्वतः घोषणा दिल्या. नाविन्यपूर्ण कल्पना राबविणे हा जणु त्यांचा स्वभावच आहे . तसेच प्राथमिक शाळा हालीवली येथे सौ.प्रमिलाताई दिनकर यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
या कार्यक्रमांच्या वेळी ग्रामसेवक,कर्मचारी, सर्वसदस्य, उपसरपंच, शाळेचे शिक्षक, अंगणवाडी सेविका, कार्यकरत्या, विद्यार्थी, ग्रामस्थ हजर होते.मोठ्या आनंदात कार्यक्रम साजरा करण्यात आला.त्यानंतर दरवर्षाप्रमाणे ११ वा.ग्रामसभेचे आयोजन करण्यात आले परंतु यावर्षी शासकीय आदेशानुसार ग्रामसभा ऑनलाइन घेण्यात आली.कोरम अभावि तहकुब करुन ३ फेब्रुवारी ला ठेवण्यात आली आहे.
हालीवली ग्रामपंचायत सरपंच म्हणून पदभार हाती घेतल्यापासून ग्रामस्थांच्या अनेक समस्या, तक्रारींचे निवारण निरपेक्षपणे सोडविण्यात पुढाकार घेणाऱ्या आणि यापुढेही प्रत्येक कामात अग्रेसर असू ,असे प्रांजळ मत यावेळी सरपंच सौ.प्रमिला सुरेश बोराडे यांनी ध्वजारोहण कार्यक्रम प्रसंगी व्यक्त केले.