Friday, June 9, 2023
Homeमहाराष्ट्ररायगडआमराई परिसरात दगडांचा पाऊस , " माथेफिरुच्या " उपद्व्यापाने आपआपसात भांडणे !

आमराई परिसरात दगडांचा पाऊस , ” माथेफिरुच्या ” उपद्व्यापाने आपआपसात भांडणे !

कर्जत पोलीस स्टेशन देखील हतबल..

भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे ) कर्जत नगर परिषदेच्या आमराई प्रभागात गेली दोन महिन्यांपासून दगडांचा पाऊस पडत असून हि दगडे कुणीतरी माथेफिरू फेकत असल्याने अनेकांच्या घराच्या पत्र्याचे , काचेचे ,दरवाजाचे नुकसान होत असून , हि जीवघेणी दगडे थेट घरात पडत असल्याने अंगावर पडून लहान बाळ – मोठयांचे डोके फुटते की काय ? म्हणून परिसरात घबराट पसरली आहे . यामुळे या परिसरातील नागरिक एकमेकांकडे संशयाने बघत असून आपापसात भांडणे होऊन कर्जत पोलीस ठाण्यात एकमेकांविरोधात तक्रारी दाखल झाल्या आहेत.

उल्हास नदी किनारी असलेल्या कर्जत इंग्लिश मेडिकल स्कुल समोर आमराई परिसरात सर्वच ठिकाणी बैठी घारे आहेत . जवळ जवळ १०० घरांची वस्ती असून येथे सर्व कामगार , छोटे – मोठे व्यवसाय करणारे नागरिक रहातात . गेली २ महिन्यांपासून येथे घरांवर छोटी – मोठी दगडे कुणीतरी माथेफिरू फेकत आहे . हि दगडे कुणाच्याही घरांवर पडत असल्याने सर्वांच्याच घरांचे नुकसान होत आहे . घरांच्या पत्र्यावर , कौलांवर दगडे पडून ती थेट घरात येत असल्याने घरात असलेल्या छोटे बाळ , माणसांच्या डोक्यात , अंगावर पडतात कि काय ? अशी भीती सर्वानाच आहे.
यामुळे एकमेकांकडे संशयाने बघत असल्याने शिवीगाळ , भांडणे , मारामारी असे येथे प्रकार घडत असून यापुढे देखील रक्तबंबाळ होईपर्यंत मारझोड , तर प्रसंगी खून होईपर्यंत अनुचित प्रकार घडण्याची शक्यता नाकारता येत नाही . याबाबतीत एकमेकांवर अनेक तक्रारी झाल्या असून एकमेकांवरचा राग कुणी काढत आहे की कसे ? हे शोधणे मोठे जिकरीचे ठरत आहे , कर्जत पोलीस स्टेशन देखील ” या माथेफिरू ” मुळे हतबल झाल्याचे दिसून येत आहेत . पकडणार तरी कुणाला ? असा यक्षप्रश्न कर्जत पोलीस ठाण्याला पडला आहे . येथे कुठेही सीसीटीव्ही कॅमेरे नाहीत , की कर्जत पोलीस ठाणे देखील पोलीस गस्त ठेवत नसल्याने दोन दिवस शांत राहिल्यावर पुन्हा दगडांचा वर्षाव होत असल्याचे निदर्शनास येत आहे.

याबाबतीत कर्जत पोलीस स्टेशनने त्वरित कार्यवाही न केल्यास येथे भयंकर अनुचित घटना घडू शकते . येथे पोलीस गस्त ठेवून , सीसीटीव्ही कॅमेरे लावणे गरजेचे आहे , तर संपूर्ण परिसरातील नागरिकांची यादी बनवून त्यातील कुणाच्या घरांवर दगडी पडल्यात व कुणाच्या नाहीत , अशी यादी बनवून सखोल चौकशी केल्यास , नक्कीच तो एक कि अनेक ” माथेफिरू ” आहेत ते सापडू शकतात , कि बाहेरचा कुणी येऊन हे उपद्व्याप करत आहे , अशी चर्चा सध्या येथे होत आहे . यामागे आमराई परिसर उठवून लावण्याचा कुणाचा प्लॅन तर नाही ना ? अशी शंका देखील येत असून , यामागे नक्की कोण आहे ? हे शोधणे कर्जत पोलीस ठाण्याची मोठी कसोटी असून , ते देखील हतबल झाल्याचे चित्र पाहण्यास मिळत आहे.

You cannot copy content of this page