एकविरा यात्रेला दारू घेऊन जाणाऱ्या एकास पोलिसांनी ताब्यात घेऊन हजारोची दारू केली जप्त…

0
385

कार्ला दि.6 : कुलस्वामिनी श्री एकविरा देवी यात्रेच्या पार्श्व् भूमीवर कार्ला परिसरात दारू बंदी आदेशाची अंमलबजावणी करत असताना लोणावळा ग्रामीण पोलिसांनी अवैध दारू खांद्यावर वाहून नेणाऱ्या इसमाला ताब्यात घेतले आहे.

नितेश नारायण नागावकर ( रा. अलिबाग, रायगड ) असे ताब्यात घेतलेल्या इसमाचे नाव आहे. पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या आदेशानुसार पोलीस पथक आज रात्री 8:00 वाजण्याच्या सुमारास चैत्री यात्रे निमित्ताने कार्ला फाटा ते वेहेरगाव दरम्यान पेट्रोलिंग करत असताना पोलीसांना एक इसम त्याच्या खांद्यावर खाकी रंगाचा बॉक्स घेऊन जात असताना संशयस्पद वाटल्याने त्यास हटकले असता तो पोलीस बघून पळ काढू लागला त्यास पाठलाग करून पकडण्यात आले.

त्याच्या जवळील बॉक्स तपासला असता त्यामध्ये मॅकडोल कंपनीच्या 375 मिली दारूच्या 17 बाटल्या एकूण 5440 रु. किमतीची अवैध दारू मिळून आली आहे. सदर दारू कुठे घेऊन चालला याचा परवाना आहे का अशी विचारणा केली असता त्याच्याकडे कोणताही परवाना मिळून आला नाही.याबाबत पोलीस नाईक किशोर पवार यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशमध्ये फिर्याद दिली असून पुढील तपास शकील शेख करत आहेत.

पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या सूचनेनुसार पोलीस उपनिरीक्षक सचिन बनकर, सहाय्यक फौजदार सिताराम बोकड,पोलीस हवालदार शकील शेख, पोलीस नाईक किशोर पवार यांच्या पथकाने सदर कारवाई केली आहे.

एकविरा देवीच्या चैत्री यात्रे निमित्त कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांनी यात्रा काळात कार्ला परिसरात दारू बंदी आदेशाची कडक अंमल बजावणी सुरु केली असून भाविकांनी आदेशाचे व सूचनेचे पालन करून प्रशासनास सहकार्य करावे असे आवाहन केले आहे.