कडक उन्हाचे चटके लागूनही नगरपरिषद इमारतीच्या आवारातील थंडगार पाणपोई कोरडीच…

0
211

लोणावळा : लोणावळा नगरपरिषद व लायन्स क्लब ऑफ लोणावळा डायमंडच्या वतीने भाजी मार्केट जवळ नगरपरिषद इमारतीच्या आवारात “श्रीमती पद्माबाई माणिकचंदजी टाटिया पाणपोई ” चे लोकार्पण 2019 साली झाले होते.

त्यांनतर काही वर्ष ही पाणपोई सुरळीत सुरु होती. परंतु कालांतराने याचे नळ चोरीला जाऊ लागल्याने पाणी वाया जात होते,म्हणून नगरपरिषदेने येथील पाण्याचा कॉक बंद करून ठेवला आता सध्या येथे पाणी नसून इथे फक्त धूळ दिसत आहे. ही पाणपोई नगरपरिषद आवारात असल्यामुळे याची पूर्ण स्वच्छता व देखभाल नगरपरिषदेकडे सोपविण्यात आली होती. परंतु त्याकडे मात्र लायन्स क्लब ऑफ लोणावळा डायमंड च्या प्रतिनिधिचे आणि नगरपरिषदेचे दुर्लक्ष होत असल्यामुळे थंडगार व शुद्ध पाणी मिळणारी पाणपोई आहे मात्र पाणीच नाही अशी दुरावस्था झाली आहे.

सध्या सर्वत्र उन्हाचा कडक पारा वाढत असल्यामुळे सर्व सामान्य नागरिक पाणपोई बघून तिथे पाणी पिण्यासाठी जात आहेत आणि पाणी नसल्याने नाराजी व्यक्त करत आहेत. त्याचबरोबर शहरातील भाजी मार्केट, फ्रुटस मार्केट तसेच फुटपाथ वर राहणारे गोर गरीब तसेच रस्त्यावर किरकोळ व्यवसाय करणारे आदिवासी येत असतात ही पाणपोई सुरु झाल्याने या लोकांना स्वच्छ व थंडगार पाणी प्यायला मिळेल आणि खऱ्या अर्थाने पाणपोई निर्मिती मागचे उद्देश पूर्ण होईल.सध्या तरी या पाणपोईचा तहानलेल्यांना काहीच फायदा होत नसून ही पाणपोई धूळ खात पडली आहे. फुटपाथ वरील राहणारे गरीब लोकं चक्क लोणावळा नगरपरिषदेने हुतात्म्यांच्या शिल्पाच्या सुशोभीकरणासाठी तयार केलेल्या कृत्रिम धबधब्यातील पाणी वापरत असल्याचे चित्र दिसत आहे.