Sunday, December 8, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जतच्या श्री धापया महाराज आखाड्यात " हरियाणाचा संदीप चहर " अजिंक्य !

कर्जतच्या श्री धापया महाराज आखाड्यात ” हरियाणाचा संदीप चहर ” अजिंक्य !

९४ कुस्त्या खेळून धुरळा उडवित १०० वर्षांची परंपरेची साक्ष..

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) मराठी मनाचा , निधड्या छातीचा पैलवान व या मातीतील खेळ म्हटला की कुस्ती आठवते . कर्जत तालुक्यातील ” १०० वर्षांची ” परंपरा कर्जतच्या श्री धापया महाराज आखाड्यात देवस्थानाला साक्ष ठेवून या कुस्त्या खेळल्या जातात . देवस्थान कमिटी अखेरच्या कुस्तीपर्यंत सर्वांना न्याय देत हा उत्सव आजपर्यंत सुरू आहे . कुस्तीचा हा वारसा माजी नगराध्यक्ष स्वर्गीय रमेश चंदन पाटील , हसन शेख , मामा शेलार , दत्ता देशमुख यांनी सुरू केलेला आजही कुस्ती शौकिनांना पाहण्यास मिळत आहे . यावेळी अखेरच्या कुस्ती थरार हरियाणाचा संदीप चहर आणि पुण्याचा भरत लोकरे यांच्यात रंगली. यात संदीपने भरतला चीतपट करून अजिंक्य ठरला.

कर्जतमध्ये दरवर्षी अक्षय तृतीया या दिवशी श्री धापया महाराजांचा उत्सव सोहळा पार पडतो , व दुसऱ्या दिवशी येथील आखाड्यात कुस्तीचे सामने रंगतात . धापया आखाड्यात सकाळी ९ वाजल्यापासून स्थानिकांमध्ये कुस्त्या होऊन लढतींना प्रारंभ झाला. कर्जत तालुका कुस्तीगीर संघटनेचे अध्यक्ष भगवान धुळे यांच्या हस्ते उ‌द्घाटन झाले. या वेळी ज्येष्ठ पंच मारूती ठाकरे, देवस्थानचे अध्यक्ष गणेश शिंदे, महेंद्र चंदन, मनोज वरसोलिकर, सचिन दगडे, गौरव भानुसघरे, हेमंत पवार, अमित गुप्ता, प्रशांत पाटील, मलेश भोईर , यांच्यासह कुस्तीप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते . सकाळच्या प्रहरात ५२, तर दुपारच्या वेळी ४२ अशा एकूण ९४ कुस्त्या झाल्या. सकाळच्या सत्रात विजय ठोंबरे विजेता ठरला. त्याला रोख पारितोषिक व गदा देण्यात आली. अंतिम कुस्तीमध्ये हरियाणाचा संदीप चहर याने भरत लोकरेला मात देत बाजी मारली.

या कुस्तीसाठी उपजिल्हा प्रमुख तथा जेष्ठ शिवसेना नगरसेवक नितीन दादा सावंत यांनी ११ हजार रुपयांचे पारितोषिक ठेवले होते. याबरोबरच अन्य दानशुरांनीही रोख बक्षिसे जाहीर केल्याने या कुस्तीच्या पारितोषिकाची रक्कम १६ हजार रुपयांवर गेली. भगवान धुळे व सर्व उपस्थित मान्यवरांनी आखाडा विजेता संदीप चहर याला गदा देऊन गौरविले. यावेळी दोन्ही सत्रात पंच म्हणून दीपक भुसारी, दत्तात्रेय म्हसे, रमेश लोभी, वासुदेव भगत यांनी काम पाहिले. १०२ वर्षांचे कुस्ती पंच मारुती ठाकरे व दत्तात्रेय पालांडे यांचा विशेष सन्मान करण्यात आला. यावेळी श्रीराम पाटील यांनी श्री धापया महाराज आखाड्याचा इतिहास कथन केला . दिलीप ठाकरे यांनी सूत्रसंचालन केले. या आखाड्यात रोख पारितोषिके देण्यासाठी पप्पू गुरव, मंगेश देशमुख, अमित गुप्ता, पंकज बडेकर, योगेश देशमुख, सुवर्णा जोशी, महेंद्र चंदन, नितीन गुप्ता, अभिजित मुधोळकर, बंटी गुप्ता आदींनी सहकार्य केले.

माजी नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, माजी नगरसेवक नितीन दादा सावंत, निलेश घरत, मुकेश पाटील, कैलास गायकवाड, अशोक शिंदे, प्रकाश आणेकर तसेच देवस्थान समिती सदस्य आदींच्या हस्ते जिंकलेल्या कुस्तीगिरांना पारितोषिके देण्यात आली. यावेळी दिल्ली – हरियाणा – मुंबई – पुणे – सातारा – सोलापूर – कोल्हापूर – उस्मानाबाद – नाशिक – अहमदनगर – रायगड – नवी मुंबई – तसेच कर्जत तालुक्यातील अनेक पहेलवानांनी या कुस्ती स्पर्धेत भाग घेऊन आपला खेळ दाखवला.
- Advertisment -

You cannot copy content of this page