कर्जतमध्ये महाशिवरात्री उत्साहात साजरी.. शिवलिंगाचे दर्शन घेण्यास शिवभक्तांची हजेरी ! 

0
131

भिसेगाव-कर्जत(सुभाष सोनावणे)आपल्या शांत आणि भोळ्या स्वभावाने हिंदू धर्मात मानाचे स्थान असलेले भोले शंकराची आज दि .१ मार्च २०२२ रोजी असलेली  महाशिवरात्री  कर्जतमध्ये मोठ्या उत्साहात साजरी झाली.कर्जत शहरातील व तालुक्यातील अनेक शिव मंदिरात शिवभक्तांनी दर्शनासाठी रांग लावली होती.आजच्या दिनी शिवलिंगाचे दर्शन घेऊन उपवास पकडणारे अनेक शिवभक्तांनी शिवमंदिरात दर्शन घेतले.कर्जत शहरातील प्राचीन काळापासून ” ओम कपालेश्वर मंदिर ” आहे.

पेशवे काळातील हे मंदिर असून येथील शिवलिंगाचे अनेक भक्त बारामाही दर्शन घेत असतात.शहराच्या मध्यवर्ती ठिकाणी हे मंदिर असून येथे सर्व सण – उत्सव मोठ्या उत्साहात साजरे होतात.कर्जत शहरातील मुद्रे ( खुर्द ) येथे ” मुद्रेश्वर मंदिर ” असून ते मुद्रे ग्रामस्थांचे श्रद्धास्थान आहे.या मंदिराच्या समोरील बाजूस कर्जत मुरबाड राज्य मार्ग आहे , तर मागील बाजूस कर्जत कृषी संशोधन केंद्राची शेती आहे.

काही वर्षापूर्वी हे मंदिर ज्या परिसरात आहे तिथे शंकराची पिंड आढळून आली होती.या पिंडीची स्थापना करून या मंदिराचे पुजारी अनंत मोधळे आणि वनिता मोधळे हे या मंदिराची साफसफाई, पूजाअर्चा तसेच मंदिराची देखभाल करत होते, त्यानंतर १९९८ मध्ये या मंदिराच्या चारी बाजूला मंदिराचे शेड उभारण्यात आले व तेव्हापासून हे मंदिर मुद्रेश्वर मंदिर म्हणून ओळखले जाते , आणि तेव्हापासून येथे महाशिवरात्रीचा उत्सव मोठया उत्साहात साजरा करण्यात  येतो.या दिवशी शिवभक्त मोठ्या प्रमाणात शिवपिंडीचे दर्शन घेतात.

तर तमनाथ येथील शिव शंकर भोलेनाथाचे मंदिर देखील प्राचीन काळातील आहे . जुन्या दगडांचे , जुन्या संस्कृतीचे दर्शन घडविणारे हे देवस्थान असून महाशिवरात्री या दिवशी पहाटे पासून येथे दर्शनासाठी रांग असते.अशा प्रकारे भोले शिव शंकराच्या दर्शनाने  आजची  महाशिवरात्री उपवास पकडून शिव भक्तांनि मोठ्या उत्साहात साजरी केली . तर सर्व ठिकाणी महिलांची उपस्थिती दर्शनीय होती.