Friday, June 2, 2023
Homeमहाराष्ट्ररायगडकर्जत चार फाट्यावरील हायमास स्ट्रीट लाईट बंद असल्याने नागरिकांची गैरसोय !

कर्जत चार फाट्यावरील हायमास स्ट्रीट लाईट बंद असल्याने नागरिकांची गैरसोय !

भिसेगाव – कर्जत(सुभाष सोनावणे ) कर्जत शहराचे प्रवेशद्वार असलेले चारफाट्यावर पूर्वी कर्जत नगर परिषदेच्या माध्यमातून स्ट्रीट लाईट लावण्यात आलेली होती . मात्र वाढते नागरीकरण व पर्यटकांच्या गर्दीमुळे येथील परिसरात रोषणाई व्हावी , हा उद्दात हेतू डोळ्यासमोर ठेवून हालीवली ग्रामपंचायत सरपंच सौ . प्रमिला बोराडे व येथील मा . विभागप्रमुख सुरेश बोराडे यांनी विशेष प्रयत्न करून एम एस आर डी सी च्या मदतीने सप्टेंबर २०२१ रोजी हायमास ही स्ट्रीट लाईट लावून येथील परिसर उजळून टाकला होता.

मात्र या हायमास स्ट्रीट लाईटचे विजेचे बिल कोण भरणार ? या मुद्यावरून गेल्या महिनाभरापासून ही प्रवेशद्वाराची हायमास लाईट बंद असल्याने नागरिकांना वाहने चालविताना गैरसोय होत असून भविष्यात एखादी जबरी गुन्हा घडल्यास येथील सीसीटीव्ही कॅमेराचे चित्रीकरण देखील दिसणार नसल्याने ताबडतोब यावर मार्ग काढण्याची मागणी नागरिकांमधून होत आहे.हालीवली ग्रामपंचायत हद्दीत येणारे व कर्जत शहराचे प्रवेशद्वार म्हणजे चारफाटा येथील शिवसेनेचे मा.विभागप्रमुख सुरेश बोराडे यांच्या विशेष प्रयत्नाने रात्रीच्या वेळी वाहनधारकांचा प्रवास सुखकर व्हावा , व वाहने पार्क करून चहा – पाणी विश्रांती घेऊन अपघाताची मात्रा टाळण्यासाठी अशा कर्जत तालुक्यातील पर्यटन स्थळाच्या मुंबई –  पुणे – माथेरान – मुरबाड हायवेवरील विश्रांतीचे ठीकाण याठिकाणी भविष्यातील ऐतिहासिक चारफाटयावर नविन मोठा ” हायमास दिवा ” लावण्यात आल्याने येथील परिसर उजळून निघाला होता.

पर्यटकांना व तालुक्यातील बहुसंख्य गावे या परिसरात असल्याने तसेच रेल्वे गेट परिसर , भिसेगाव , गुंडगे येथील नागरिक , ग्रामस्थ बाजारहाट , रेल्वेच्या प्रवासासाठी , नोकरी , कामधंद्यासाठी रात्री अपरात्री याच चाराफाट्यावरून कुणी चालत , कुणी आपल्या दोनचाकी वाहनांवरून प्रवास करतात.रात्रीच्या वेळेस चारफाटा  प्रकाशमान झाल्याने जाता येताना कुणालाही त्रास , अथवा अपघातासारखी परिस्थिती आता रहाणार नाही , त्यामुळे येथील ग्रामस्थ , स्थानिक व्यवसायिक खुप आनंदीत झाले होते तसेच प्रवासी वर्गाची देखील सोय झाली होती.

चारफाटा प्रकाशाने उजळून निघाल्याने हालिवली व कर्जत शहराचे प्रवेशद्वार चारफाटयावर जणु मुंबईच अवतरली होती . त्यामुळे , येथील स्थानिक व्यवसायिक पिंटु बोराडे , नितीन ठाणगे , विलास बोराडे, गुरूनाथ पालकर आदी व्यापारी वर्गांनी या कामाचे कौतुक केले होते , तर सरपंच सौ . प्रमिला बोराडे व सुरेश बोराडे यांच्या या कामाची दखल घेऊन आमदार महेंद्रशेट थोरवे , कर्जत न.प. च्या नगराध्यक्षा सौ. सुवर्णा जोशी , यांनी देखील वाहवा केली होती व यापुढे हालीवली ग्रामपंचायतीसाठी मागेल ती मदत करू , असे आश्वासन त्यांनी दिले असताना आता ही हायमास स्ट्रीट लाईट बंद असताना याचे येणारे लाईट बिल कोण भरणार , हालीवली ग्रामपंचायत की कर्जत नगर परिषद ? या मुद्यावरून ही लाईट बंद झाल्याचे समजण्यात येते.

तर ही समस्या आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी लक्ष घालून सोडवावी , जेणेकरून नागरिकांना प्रवास करताना त्रास होणार नाही , अशी मागणी नागरिकांमधून जोर धरू लागली आहे.

You cannot copy content of this page