कर्जत तालुक्यातील शेतक-यांचे भात हमी भावाने खरेदी झालेच पाहिजे !

0
82

भिसेगाव-कर्जत( सुभाष सोनावणे) शेतकऱ्यांचा शेतात पिकणारा भात हमीभावाने खरेदी झाल्यास त्याला चांगले उत्पन्न मिळते , मात्र शासनाच्या जटिल अटीमुळे अशिक्षित असलेल्या व आधुनिक आणि तंत्रज्ञानाची माहिती नसलेल्या शेतकऱ्यांना अडवणूक करून नाहक त्रास देण्याच्या शासनाच्या वृत्तीचा भारतीय जनता पक्षाने कडाडून विरोध करत शेतकऱ्यांचा भात हमीभावाने खरेदी झालाच पाहिजे , अन्यथा जाचक अटी लावणाऱ्या या प्रशासनाच्या विरोधात तीव्र आंदोलन छेडण्यात येईल , असा इशारा किसान मोर्चा कोकण संघटक सुनील गोगटे यांनी आज निवेदनाद्वारे कर्जत तहसील कार्यालयाला दिला आहे.

आज भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या वतीने कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांचे भात हमीभावाने खरेदी केंद्रावर खरेदी झालेच पाहिजे यासाठी तसे तहसीलदार कर्जत यांना निवेदन दिले .अनेक शेतकऱ्यांना भात खरेदी केंद्रावर गेले असता तुमचे ऑनलाईन रजिस्ट्रेशन झाले असेल तरच तुमचे भात खरेदी केले जाईल , असे सांगितले जाते. ३० ऑक्टोबर २०२१ रोजी ऑनलाईन रजिस्ट्रेशन बंद झाले.

अनेक शेतकऱ्यांना हे रजिस्ट्रेशन करायचे होते हे माहितीही नव्हते .शहरापासून कोसो दूर असलेल्या व तंत्रज्ञानाची माहिती नसलेल्या शेतकऱ्यांची त्यात काय चूक , असा सवाल भाजपचे नेते सुनील गोगटे , यांनी उपस्थित करत शासनाच्या या जटिल अटीमुळे त्यांनी आता भात कुठे विकायचे हा प्रश्न उभा राहिला आहे . बाहेर बाजारभावा प्रमाणे चौदाशे ते पंधराशे रुपये प्रती क्विंटल भाताचा दर मिळतोय , तो फारच तुटपुंजा आहे. त्यामुळे शेतकऱ्याचे प्रतिक्विंटल सातशे ते आठशे रुपये नुकसान होणार आहे.कोरोना संसर्ग महामारी , अतिवृष्टी , महापूर , वादळवारा यामुळे आधीच शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे , यावर शेतकऱ्यांना सहानुभूती देण्या ऐवजी भात खरेदी केंद्रे हमीभावाने भात खरेदी करण्यास नकार देत शेतकऱ्यांच्या जखमेवर मीठ चोळण्याचे विखारी काम करत आहे.

म्हणूनच यावर शासनाला जागे करण्यासाठी व कर्जतच्या तहसीलदार यांनी या गंभीर बाबीकडे लक्ष देण्यासाठी भाजप किसान मोर्चाच्या वतीने तहसीलदार कर्जत विक्रम देशमुख यांची भेट घेऊन त्यांना निवेदन वजा मागणी करून ईशारा देण्यात आला की , शेतकऱ्यांचा भात हमी भावाने खरेदी झालेच पाहिजे म्हणून स्वतः शेतकरी आधार कार्ड आणि सातबारा घेऊन केंद्रावर आल्यावर त्यांचे भात खरेदी केले पाहिजे किंवा ऑनलाईन रजिस्टर करण्याची मुदत वाढवून द्यावी , अशी मागणी केली आहे .

जर ही मागणी मान्य झाली नाही तर भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाच्या वतीने तीव्र आंदोलन जिल्ह्याबरोबरच कर्जत तालुक्यात केले जाईल , असा इशारा कोकण प्रदेशचे संपर्कप्रमुख सुनील गोगटे यांनी दिला आहे. याप्रसंगी किसान मोर्चाचे कोकण संपर्कप्रमुख सुनील गोगटे यांच्या समवेत जिल्हाध्यक्ष परशुराम म्हसे , कर्जत तालुका अध्यक्ष शिरीष कदम , तालुका कार्यकारणी सदस्य नथू कराळे , सामाजिक कार्यकर्ते दशरथ मुने हे उपस्थित होते.