कर्जत भूमिअभिलेख कार्यालयात लाच घेताना दत्ता जाधव जेरबंद..

0
623

भिसेगाव-कर्जत(सुभाष सोनावणे)पुराण काळातील ” वाटमाऱ्या वाल्या कोळ्याची ” कथा आपल्याला सर्वांना माहीतच असेल , तूच तुझ्या पापाचा वाटेकरी , असे सांगणारी त्याची पत्नी मात्र या आधुनिक आणि तंत्रज्ञान युगात सापडल्यास भ्रष्टाचाराला आळा बसून देश सुधारण्यास नक्कीच हातभार लागेल , असेच लाच घेणाऱ्या कुटुंब प्रमुख असणाऱ्या शासकीय अधिका-यांच्या बाबतीत म्हणावे लागेल.

चंगळवाद वाढलेल्या या जमान्यात पगारा व्यतिरिक्त जादा कमाई आपला पती व बाबा कुठून आणतोय , यावर आता कुटुंबातील पत्नी , मुले यांनी लक्ष ठेवणे गरजेचे आहे , तरच भ्रष्टाचाराला चाप बसून देशव्यापी वाढत असलेल्या भ्रष्टाचारी शासकीय अधिकारी – कर्मचारी वर्गाला चपराक बसेल.अशीच एक लाच घेणारी घटना कर्जत उपअधीक्षक भूमी अभिलेख कार्यालयात घडली असून रायगड – अलिबाग च्या लाचलुचपत प्रतिबंधक अधिकारी वर्गाने हि धाड सापळा रचून लाच मागणारे छाननी लिपिक दत्ता जाधव यांना जेरबंद केले आहे.

कर्जत तालुका हा मुंबई – पुणे रेल्वे प्रवासा दरम्यानचा मध्य आहे.आदिवासी बहुल भाग असला तरी येथे मुंबई स्थित धनाड्यांच्या जमीन खरेदी – विक्रीमुळे करोडो रुपयांची कामे येथे होत असतात.शासकीय अधिका-यांचे हात गरम झाल्यावर ” घंटो का काम , मिनिटो में ” करून देत असताना या अधिकारी वर्गांना त्याची सवय लागते . हि साखळी वर पासून खालपर्यंत असल्याने सामान्य नागरिकांची कामे होत नसल्याच्या तक्रारी केल्यातरी त्यावर कुठलीच कारवाई दिसून येत नाहीत . पैसे द्या , तरच काम होईल ,अशी अडवणूक करत स्थानिक भूमिपुत्रांना देखील हे अधिकारी त्रास देतात.

आणि मग वैतागलेला सामान्यजन कायद्याचा आधार घेत अश्या भ्रष्टाचारी अधिकारी वर्गाची लाच घेताना पकडून देऊन चांगलीच मुस्कटदाबी करतो.कर्जत भुमिअभिलेख कार्यालयातील छाननी लिपिक दत्ता जाधव याला १० हजार रुपयांची लाच घेताना अलिबाग लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने सापळा रचून रंगेहाथ पकडले.कैलास पेरणेकर या तक्रारदारांस अरवंद या गावी दिनांक २५ ऑक्टोबर २०२१ रोजी आपल्या जागेची शासकीय मोजणी केली होती , सात गुंठे जागेच्या झालेल्या मोजणीची व हद्द कायम प्रत मिळावी यासाठी पेरणेकर भूमी अभिलेख कार्यालयात आले असता त्यांच्याकडे हे काम पूर्ण करण्यासाठी सातत्याने पैशाची मागणी केली जात होती.

छाननी लिपिक दत्ता जाधव हे काम पूर्ण करून देण्यासाठी पेरणेकर यांच्या कडून दहा हजार रुपयांची मागणी करत होते परंतु तक्रारदार पेरणेकर यांनी ही रक्कम देण्यास नकार दिला होता तसेच त्यांनी लाचलुचपत विभाग अलिबाग डीवायएसपी सुषमा सोनवणे यांच्याकडे तक्रार नोंदवली होती.या तक्रारींची तत्काळ दखल घेत कर्जत भूमिअभिलेख कार्यालयात सापळा रचून छाननी लिपिक दत्ता जाधव यांस दहा हजार रुपयांची लाच घेताना रंगेहात पकडले आणि त्याला अटक करण्यात आली.

यापूर्वी कर्जतमध्ये तहसील कार्यालयात तहसीलदार , कर्जत तलाठी , कर्जत नगर परिषद , वीज कंपनी अभियंता , वन विभाग , तर आता भूमिअभिलेख कार्यालय अशी लाच घेताना अधिकारी – कर्मचारी वर्गास पकडले असल्याची प्रकरणे झाली आहेत.