कर्जत वीज कंपनीच्या ढिसाळ कारभारा विरोधात आमरण उपोषण !

0
677

पोलीस मित्र संघटना घेणार वीज अधिका-यांचा समाचार…

भिसेगाव-कर्जत(सुभाष सोनावणे)रायगड जिल्ह्यातील कर्जत उपविभागीय कार्यालयाच्या अंतर्गत येणाऱ्या कर्जत तालुक्यातील वीज कंपनीच्या आठ उपकार्यालयात चाललेल्या ढिसाळ कारभारामुळे नागरिकांत वीज अधिकारी वर्गांच्या विरोधात संताप खदखदत असून वीज बिलांबरोबरच इतर सुविधा देताना करत असलेल्या बेजबाबदारपणाने कळस गाठला असून याविरोधात पोलीस मित्र संघटनेने दंड थोपटले असून याचा समाचार घेण्यासाठी दि.२८ मार्च २०२२ पासून तीन दिवस ठिय्या आंदोलन , तीन दिवस आमरण उपोषण तर त्यानंतर मागण्या मान्य न झाल्यास आत्मदहन करण्याचा ईशारा संघटनेचे महाराष्ट्र प्रदेश कोकण विभागीय अध्यक्ष रमेश कदम व उपाध्यक्ष दशरथ मुने यांनी दिला असून त्यांच्या आंदोलनाचा आज दुसरा दिवस आहे.

कर्जत मधील जुन्या नगर परिषद कार्यालयाच्या शेजारी उपोषणाला नागरिकांचा जोरदार पाठींबा मिळत आहे.पोलीस मित्र संघटनेने केलेल्या मागण्या देखील रास्त आहेत .सन २००० साली प्रत्येक ट्रान्सफॉर्मरच्या अंतर्गत येणाऱ्या विजेच्या पोलचे सर्व्हे करून एका पोलवर किती कनेक्शन आहेत , त्या पोलचा क्रमांकासहित माहिती होती , मात्र त्या कामाचा आता पुरता बोजवारा उडाला आहे.म्हणून तालुक्यातील सर्व पोलवर नंबर टाकण्यात यावे व सर्व पोलची यादी देण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.

तालुक्यातील अनेक वर्षे पुर्वी पासूनचे जुने गंजलेले – वाकलेले पोल व जून्या वायर तात्काल बदलण्यात याव्यात, तालुक्यातील पोलवरील वायरवर आलेल्या झाडांच्या फांदया तात्काल तोडण्यात याव्या, तालुक्यातील नवीन इमारतींना नवीन कनेक्शन रुपी लावायला मीटर वीज कंपनीला मिळतात , मात्र फॉल्टी झालेले मीटर बदलण्यास मीटर नसल्याने ग्राहकांना नाहक वाढीव बिलांचा सामना करावा लागत आहे. म्हणूनच तालुक्यातील सर्व विज ग्राहकांच्या फॉल्टी व बंद मीटरची यादी देण्यात यावी, व ते फॉल्टी व बंद मीटर तात्काल बदलून देण्यात यावे, विज ग्राहकांकडुन फॉल्टी व बंद मीटरची अनेक महीने सरासरी पेक्षा जास्त बिले घेतलेली आहेत ,त्या सर्व विज ग्राहकांचे पैसे परत करावे, वीज कंपनी नवीन पोल बसविण्याचा ठेका देत असते , मात्र टक्केवारीत गुंतलेले अधिकारी हे ठेकेदार निकृष्ठ दर्जाचे काम करत असल्याचे दिसूनही दुर्लक्ष करतात , त्यामुळे ते पोल त्वरित झुकतात , यामुळे जीवितहानी , व नागरिकांचे वित्त हानी होऊ शकते.

म्हणून असे पोल त्वरित व्यवस्थित करण्यात यावेत तर काही पोल पेंन्टीग केलेले नाहीत त्यांची यादी देऊन ते पेंट करावेत , विज चोरी प्रकरणी पकडलेल्या विज ग्राहकांवर गुन्हा दाखल केलेल्या व दंड आकारुन सोडुन दिलेल्या ग्राहकांची यादी देण्यात यावी, तालुक्यात सर्व ट्रान्सफार्मर जवळील गंजलेले , उघडे असलेले कटाऊट बॉक्स बदलण्यात यावेत व झाकने बसवण्यात यावी, त्याचप्रमाणे बिलांच्या देखील खूप तांत्रिक तक्रारी त्यांच्याकडे आल्या असून अधिकारी वर्ग वीज कंपनीचे तंतोतंत कायदे राबवितात आणि ग्राहकांना सुविधा कोण पुरविणार असा संतापजनक सवाल पोलीस मित्र संघटनेने विचारला असून आज पर्यंत चाललेल्या वीज कंपनीच्या अधिकारी वर्गाचा मनमानी कारभाराचा पर्दाफाश या उपोषणाने होणार असल्याचे चित्र येथे दिसून येत आहे.

अश्या मागण्या पोलीस मित्र संघटनेचे कोकण अध्यक्ष रमेश शांताराम कदम व उपाध्यक्ष दशरथ नानु मुने यांनी केल्या आहेत.या मागण्यामुळे पोलीस मित्र संघटनेने वीज कंपनीचा चांगलाच समाचार घेतला असून आजपर्यंत वीज ग्राहकांची चाललेली लूटमारी यानिमित्ताने नक्कीच कमी होणार आहे. कर्जतचे उपकार्यकारी अभियंता नागरिकांसाठी पारित केलेले कायदे – अधिकार पायदळी तुडवत असून शासन नियमांना केराची टोपली दाखवीत आहेत ,त्यांच्या या मनमानी कारभाराचा व ग्राहकांची करत असलेल्या फसवणुकी विरोधात पोलीस मित्र संघटनेचे कोकण अध्यक्ष रमेशदादा कदम यांच्या या अधिकारी वर्गाविरोधातील १५ वे उपोषणाकडे सर्वांचेच लक्ष लागून आहे.