कर्जत शहरात भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांचा पूर्णाकृती स्मारक बनवा..

0
172
भिसेगाव- कर्जत(सुभाष सोनावणे)कर्जत तालुक्यातील तमाम बौद्ध बांधव तसेच संपूर्ण बहुजन समाजाची अस्मिता असलेले महामानव भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती – उभा असलेला पुतळा बसविणे बाबत कर्जत नगर परिषद हद्दीतील कर्जत बुद्धनगर येथील भीमगर्जना मित्र मंडळाने कर्जत नगर परिषदेकडे तालुक्यातील तमाम बौद्ध बांधवांच्या व बहुजन वर्गाच्या वतीने मागणी केली आहे.
कर्जत तालुक्यात बौद्ध बांधवांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे.म्हणूनच येथे राजकीय- धार्मिक-शैक्षणिक-सामाजिक क्षेत्रात त्यांचे कार्य मोठ्या जोमाने चालू आहे.छत्रपती-फुले-शाहू – व डॉ.बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या विचारांचा येथे तमाम बौद्ध बांधव व बहुजन वर्गावर पगडा आहे.महापुरुषांच्या जयंती महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असताना विश्वरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती स्मारकाची कर्जत तालुक्याच्या इतिहासात भर घालणारी घटना आहे.
कर्जत नगर परिषदेच्या कार्यक्षेत्रात असलेले विश्वरत्न डॉ. बाबासाहेबांचे स्मारक नगरपरिषदेच्या निधीतून बांधले गेले आहे.त्या स्मारकात बाबासाहेबांचा अर्धाकृती पुतळा गेले कित्येक वर्षापासून बौद्ध बांधवांनी काढलेल्या निधीतून बसविलेला आहे.त्या अर्धकृती पुतळ्याच्या जागी आपल्या निधीमधून पूर्णाकृती उभा असलेला डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा बसवुन या स्मारकाचे सुशोभीकरण करण्यात यावे ,अशी मागणी भीमगर्जना मित्र मंडळ कर्जत- बुद्धनगर यांनी आज कर्जत नगर परिषदेला निवेदनाद्वारे केली आहे.
तरी या मागणीची लवकरात लवकर पूर्तता करावी अशी त्यांनी पालिकेचे मुख्याधिकारी डॉ.पंकज पाटील व नगराध्यक्षा सौ.सुवर्णा जोशी यांना विनंती करण्यात आली आहे.सदर निवेदन पालिकेचे कार्यालय प्रमुख राऊत यांना देताना भीमगर्जना मित्र मंडळ चे प्रमुख पदाधिकारी सचिन भालेराव , योगेश गायकवाड , गणेश धनवटे ,संतोष आडसुळे व अन्य सदस्य उपस्थित होते.