Monday, July 14, 2025
Homeक्राईमकुसगावमध्ये बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अत्याचार; परिसरात संतापाची लाट..

कुसगावमध्ये बापाकडूनच अल्पवयीन मुलीवर अत्याचार; परिसरात संतापाची लाट..

लोणावळा ग्रामीण पोलिसांकडून आरोपी वडिलाला अटक; आईच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल..

लोणावळा (प्रतिनिधी) : लोणावळा शहरालगत असलेल्या कुसगाव (भैरवनाथ नगर) परिसरात एका बापानेच आपल्या अल्पवयीन मुलीवर बलात्कार केल्याची संतापजनक घटना घडली आहे. घरात कोणी नसल्याचा फायदा घेत बापाने पोटच्या मुलीवरच अत्याचार केला. या प्रकरणी लोणावळा ग्रामीण पोलिसांनी तात्काळ कारवाई करत आरोपी वडिलाला अटक केली आहे. परिसरात या घटनेचा तीव्र निषेध होत असून आरोपीला कठोर शिक्षा व्हावी, अशी मागणी नागरिकांकडून केली जात आहे.

सदर पीडित मुलीच्या आईने लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून त्यानुसार, २० जून रोजी सायंकाळी साडेपाचच्या सुमारास, कॉक्रीट इंडिया कंपनीजवळील भैरवनाथ नगर, कुसगाव बुद्रुक येथील त्यांच्या राहत्या घरी ही घटना घडली. घरात मुलगी एकटी असताना तिच्या पित्यानेच तिच्यावर अत्याचार केला. अत्याचार केल्यानंतर आरोपीने पीडितेला कुणालाही सांगितल्यास जीवे मारण्याची धमकी दिली.

घरी आई परतल्यानंतर पीडित मुलीने संपूर्ण प्रकार आईसमोर उघड केला. ते ऐकताच आईने धाडस दाखवत लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. या तक्रारीवरून गु.र.नं. 172/2025 अंतर्गत भारतीय दंड विधानाच्या कलम 64(2)(F), 65(1) तसेच POCSO कायदा 2012 चे कलम 4, 8, 12 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी संबंधित आरोपी वडिलाला ताब्यात घेतले असून प्रकरणाचा तपास लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक दिनेश तायडे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक विजया म्हेत्रे करत आहेत.

या अत्याचारामुळे संपूर्ण परिसर सुन्न झाला आहे. बाप-लेक या पवित्र नात्याला काळिमा फासणारी ही घटना समाजमन हलवून टाकणारी आहे. घरातच मुली सुरक्षित नसतील तर त्यांनी आसरा कुणाकडे घ्यायचा, असा सवाल उपस्थित होत आहे.

- Advertisment -

You cannot copy content of this page