Tuesday, September 26, 2023
Homeपुणेलोणावळागणपती विसर्जनाच्या सातव्या दिवशी मावळात लाऊडस्पिकरला फक्त दहा वाजेपर्यंतच सूट..

गणपती विसर्जनाच्या सातव्या दिवशी मावळात लाऊडस्पिकरला फक्त दहा वाजेपर्यंतच सूट..

लोणावळा (प्रतिनिधी):मावळ परिसरातील गणपतींचे सातव्या दिवशी विसर्जन होते. या दिवशी रात्री बारा पर्यंत लाऊडस्पीकरसाठी परवानगी नाही.त्यानुसार गणेशोत्सव मंडळांना आपल्या मिरवणुका दहा पर्यंत संपवाव्या लागणार आहेत. यामुळे मावळ परिसरातील गणेशोत्सव मंडळांमध्ये नाराजी व्यक्त केली जात आहे.
जिल्हाधिकारी डॉ. राजेश देशमुख यांनी वर्षाच्या सुरुवातीला वर्षभरातील वेगवेगळ्या सण उत्सवांच्या वेळी रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनिक्षेपक (लाऊडस्पीकर) वापरण्यास सकाळी सहा ते रात्री बारा या कालावधीत सूट दिली आहे. ध्वनीची मर्यादा राखून ध्वनिक्षेपक वापरण्यास ही परवानगी देण्यात आली असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशात नमूद आहे.
मंगळवार दि.19 रोजी गणेश चतुर्थीच्या दिवशी श्रीगणेशाचे आगमन होत आहे. त्यानंतर पुढचे दहा दिवस गणपती बाप्पांचा मुक्काम असतो. दरम्यान, जिल्ह्यात ठिकठिकाणी वेगवेगळ्या दिवशी गणेश विसर्जन होते. दीड दिवसापासून विसर्जनाला सुरुवात होते. लाडक्या बाप्पाला निरोप देण्यासाठी बहुतांश मंडळे वाजत गाजत मिरवणुका काढतात. या मिरवणुका रात्री उशिरापर्यंत चालतात.
जिल्हाधिकाऱ्यांनी लाऊड स्पीकर वाजवण्यासाठी सूट दिलेल्या आदेशात गणेशोत्सवादरम्यान चार दिवस रात्री बारा वाजेपर्यंत लाऊडस्पीकरसाठी परवानगी दिली आहे. 23 सप्टेंबर (पाचवा दिवस), 24 सप्टेंबर (सहावा दिवस), 26 सप्टेंबर (आठवा दिवस), 27 सप्टेंबर (नववा दिवस) या दिवशी ही सूट देण्यात आली आहे. मात्र, मावळ तालुक्यातील बहुतांश भागात सातव्या दिवशी विसर्जन होते. या दिवशी रात्री बारा पर्यंत लाऊडस्पीकरसाठी परवानगी देण्यात आली नाही.तळेगाव दाभाडे, शिरगाव, वडगाव, कामशेत, लोणावळा परिसरात शेकडो मंडळांची पोलीस दप्तरी नोंद असून जिल्हाधिकारी यांच्या आदेशामुळे सर्व गणेशोत्सव मंडळांचा हिरमोड झाला आहे.
- Advertisment -