गरीब कामगारांच्या समस्याकडे दुर्लक्ष करून दोन्ही सरकारे जातींचे, भोंग्यांचे राजकारण करत आहेत…डॉ. सुषमा अंधारे !

0
41

लोणावळा दि.1: आज कामगार दिनानिमित्त व महाराष्ट्र दिनानिमित्त ” ऑल इंडिया रिटायर्ड रेल्वेमेन्स फेडरेशन लोणावळा व मावळ तालुका हमाल पंचायतच्या” वतीने कामगार मेळाव्याचे आयोजन लोणावळा महिला मंडळ सभागृहात करण्यात आले.

यावेळी कायदे तज्ञ डॉ सुषमा अंधारे यांच्या प्रमुख उपस्थितीत येथील असंघटित कामगार यांच्या समस्यांबाबत विचार मंथन मेळाव्यात त्यांनी चौफेर फटकेबाजी करत राज्यातील सरकार आणि केंद्रातील सरकार गोर गरिबांच्या प्रश्नाकडे लक्ष न देता भोंगा , धर्म जातीचे राजकारण करून मूळ समस्या महागाई , बेरोजगारी या मूळ प्रश्नाकडे दुर्लक्ष करीत आहे .

यावेळी हमाल पंचायतीचे तालुका अध्यक्ष राजाराम साबळे यांनी प्रास्ताविकात लोणावळा व परिसरातील असंघटित व घरकाम करणाऱ्या महिला कामगारांच्या समस्या मांडल्या . राज्य सरकार व केंद्र सरकारच्या अनेक योजना आहेत त्या सामान्य कामगार यांच्या पर्यंत पोहचत नाहीत अशी खंत व्यक्त केली, तर मेधा थत्ते यांनी असंघटित कामगारांसाठी करोडो रुपयांचा निधी सरकारकडे पडून आहे.

एखादा कामगार मृत्यू पावल्यावर त्याच्या कुटुंबावर आभाळ कोसळते परंतु सरकार मात्र बघ्याची भूमिका घेते . त्यासाठी सर्व असंघटित कामगारांनी एकत्र येण्याची गरज असल्याचे नमूद केले तर हरिदासन यांनी रेल्वेत पूर्वी 18 कोटी कामगार काम करीत होते आज 10 कोटी कामगार रेल्वेत काम करीत आहेत, 8 कोटी कामगार हे कंत्राटी पध्दतीने भरले आहेत त्यांच्यावर अप्रत्यक्षपणे अत्याचारच होत असल्याचे त्यांनी यावेळी सांगितले . यानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष गायकवाड यांनी विचार मंथन होणे गरजेचे असल्याने सदर कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आल्याचे सांगितले.

डॉ सुषमा अंधारे यांनी केंद्र आणि राज्य सरकारच्या धोरणावर सडकून टीका केली . देशाच्या प्रत्येक नागरिकाला त्याच्या पात्रतेनुसार रोजगार उपलब्ध करून देणे हे सरकारचे काम आहे बाबासाहेब यांनी देशाच्या संविधानात तसे नमूद केले आहे मात्र दोन्ही सरकारे ही जातीचे , भोंग्यांचे राजकारण करीत असल्याचे म्हटले आहे.