गावठी दारू भट्टीवर लोणावळा ग्रामीण पोलिसांची मोठी कारवाई लाखो रुपयांचा मुद्देमाल हस्तगत…

0
790

लोणावळा 25: लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीतील वेहेरगाव जवळील कंधार्भट वस्ती येथील गावठी हातभट्टी वर छापा मारून तब्बल 2 लाख 70 हजाराचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

शिशुपाल राठोड ( रा. कंधारभट वस्ती, वेहेरगाव, ता. मावळ, जि. पुणे ) असे गावठी हातभट्टी लावणाऱ्या इसमाचे नाव असून तो फरार झाला आहे. त्याच्या विरोधात मुंबई प्रोहायबीशन कायदा कलम 65 (ख )(ड ) प्रमाणे लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार दिनांक 25/03/2022 रोजी दुपारी 4:00 वा. च्या सुमारास पोलीस उपनिरीक्षक सचिन बनकर,पोलीस हवालदार कुतूबुद्दीन खान, पोलीस हवालदार शकील शेख,महीला पोलीस कॉन्स्टेबल कोहीनकर हे एकवीरा देवी यात्रेच्या अनुषंगाने वेहरगाव हद्दीत पेट्रोलिंग करत असताना पोलीस उपनिरीक्षक बनकर यांना बातमीदारा मार्फत बातमी मिळाली की मौजे वेहरगाव च्या हृददीमध्ये कंधारभट वस्ती जवळील ओढयालगत आरोपी शिशुपाल राठोड हा बेकायदा बिगरपरवाना गावठी हातभटटीची दारू भटटी लावून तयार करण्याच्या तयारीत आहे.

अशी खात्रीशीर बातमी मिळाल्याने पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक सचिन बनकर यांनी ताबडतोब दोन पंच आणि पोलीस स्टाफला सदर ठिकाणी बोलावून घेतले,पोलीस पथकाने शासकीय वाहन अलीकडे थांबवून दारू भट्टी लावणाऱ्या राठोड यास ताब्यात घेण्यासाठी लपत छपत जात असताना राठोड याला पोलिसांची चाहूल लागताच त्याने डोंगराच्या दिशेने पळ काढला पोलीस त्याचा चूरसीने पाठलाग करत असताना तो पोलिसांच्या हाती न लागता थेट डोंगरात पसार झाला.

लोणावळा ग्रामीण पोलिसांनी केलेल्या या कारवाईत 2000 लिटरचे 4 प्लास्टीक ड्रम त्यामध्ये 8000 लिटर कच्चे रसायन 30,000 / – रू. किमतीचे , 1000 लिटरचा 1 प्लास्टीक ड्रम त्यामध्ये 1000 लिटर कच्चे रसायन असा अंदाजे 2,70,000 / – रू. किमतीचा मुद्देमाल हस्तगत करून 180 मी.ली.च्या बाटलीत कच्चे रसायन सॅम्पल घेऊन उर्वरित सर्व रसायने नष्ट करण्यात आली आहेत.

सदर बाबत पोलीस हवालदार कुतूबुद्दीन खान यांनी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली असून यातील आरोपी शिशुपाल राठोड याच्या विरोधात मुं.प्रो.का.क.65 ( ख )( ड ) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.