गावठी पिस्टल ,जिवंत काडतूसांसह..एकास वडगांव पोलिसांनी केली अटक !

0
257

वडगाव मावळ : वडगांव पोलिसांची दमदार कामगिरी एक गावठी पिस्टल व जिवंत काडतुसांसह एकास केली अटक. आज गुरुवार ( दि . 28 ) रोजी दुपारी 3:30 च्या सुमारास वडगाव मावळ पोलिसांनी मोठ्या शिताफीने आरोपीला वडगाव – तळेगाव दाभाडे फाटा येथून ताब्यात घेत कारवाई केली . या कारवाईत आरोपीकडून गावठी पिस्टल , दोन जिवंत काडतुसे असा एकूण 25 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला . याप्रकरणी ऋषीकेश सुदाम बोत्रे ( वय 29 , रा . खालुंब्रे ता खेड जि.पुणे ) यास अटक करण्यात आली असून त्याला शुक्रवारी रोजी वडगाव मावळ न्यायलायात हजर करण्यात येणार असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

वडगाव मावळ पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार , पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ . अभिनव देशमुख यांनी पोलीस ठाण्याच्या हद्दीत गुन्हेगारांवर वचक ठेवण्यासाठी गस्त घालण्याचे आदेश दिले होते . त्यानुसार गस्त घालत असताना बेकायदा गावठी पिस्टल व काडतूस बाळगत असलेला आरोपी वडगाव मावळ पोलीस ठाण्याच्या हद्दीत येणार असल्याची गुप्त माहिती पोलिसांना मिळाली होती .मिळालेल्या गुप्त बातमीच्या आधारे वडगाव – तळेगाव दाभाडे फाटा , जुन्या मुंबई पुणे महामार्गावर उर्से बाजूला आरोपी बोत्रे संशयास्पद हालचाली करताना आढळून आला . त्यावेळी मोठ्या शिताफीने पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले व त्याची अंगझडती घेतली असता गावठी पिस्टल , दोन जिवंत काडतुसे असा एकूण 25 हजार 200 रुपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला . पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक शीला खोत करत आहेत.

सदरची कारवाई पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक डॉ . अभिनव देशमुख , अप्पर पोलीस अधीक्षक , मितेश घट्टे , लोणावळा उपविभागीय पोलीस अधिकारी भाऊसाहेब ढोले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक विलास भोसले , सहा . फौजदार सुनील जावळे , कैलास कदम , पोलीस अमलदार श्रीशैल कंटोळी , मनोज कदम , संजय सुपे , अमोल तावरे , भाऊसाहेब खाडे , गणपत होले यांच्या पथकाने केली.