घरगुती गॅस एक हजार पार …महिलांमध्ये संतापाची लाट !

0
106

नक्की कोण चुकतोय , सत्ताधारी की मतदार !

भिसेगाव- कर्जत (सुभाष सोनावणे)एके काळी ३०० ते ४०० रुपयांत मिळणारा घरगुती गॅस आता एक हजाराची रक्कम पार करून गेल्याने महिला वर्गात संतापाची लाट उसळली आहे , तर कुटुंब प्रमुख म्हणून पुरुषांच्या खिशाला चाट पडत असल्याने इतर गरजा कश्या पूर्ण करायच्या , या विचाराने पुरुष वर्गातही नाराजीचा सूर असून ” नक्की कोण चुकतोय , सत्ताधारी की मतदार , या कात्रीत सापडलेले नागरिक हताश झाल्याचे चित्र सध्या कर्जतमध्ये दिसून येत आहे.

महाराष्ट्रात महाविकास आघाडीचा अद्यापी मेळ व घडी व्यवस्थित बसलेली दिसून येत नाही . वाढत्या पेट्रोल – डिझेल च्या किंमतीमुळे महागाईचा आगडोंब उसळला आहे , त्यातच घरगुती गॅस ही दिवसेंदिवस वाढत जाऊन आज एक हजारी पार झाला आहे . त्यामुळे कुटुंबाच्या गरजा भागविताना कामगार – शेतकरी – गोरगरिबांच्या तोंडाचे पाणी उडाले आहे . याबाबतीत एकही पक्ष आंदोलन करताना दिसत नाही . त्यामुळे बेजार झालेली जनता ” नक्की कोण चुकतोय , सत्ताधारी की मतदार , या विवंचनेत आहे . यांना यासाठीच का निवडून दिले , असा आक्रोश करताना दिसत आहेत . मात्र यासाठी कुठलाही पक्ष रस्त्यावर उतरून आंदोलन करताना दिसत नाही.

हि परिस्थिती गाव पातळीपासून शहारांपर्यंत असून भविष्यात याची सांगड मतदानाच्या वेळी नक्कीच दिसून येणार आहे.कोरोना संसर्ग काळापासून व नंतर नुसती लुटमारी चालू आहे . भाज्यापासून दैनंदिन लागणाऱ्या घरगुती खाण्याच्या वस्तूंच्या किंमती भरमसाठ वाढल्या आहेत . बेरोजगारी व अनेकांच्या हातचे काम सुटल्याने पैशाअभावी आता सहन होण्याच्या पलीकडे गेले असून यातून मार्ग मात्र सत्ताधारी पक्ष तर विरोधी पक्ष देखील त्याचप्रमाणे बहुजन वर्गाचे पक्ष देखील ” चकार ” शब्द काढत नसल्याने येणाऱ्या निवडणुकीत याचे पडसाद नक्कीच उमटतील यात शंकाच नसणार आहे.