जिद्द व चिकाटीच्या जोरावर कामगारांचा मुलगा भारतीय सेनेत भरती !

0
270

बाबू प्रेमानंद नाईक यांस आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी दिल्या शुभेच्छा..

भिसेगाव- कर्जत( सुभाष सोनावणे)कर्जत नगर परिषद हद्दीतील संजयनगर – दहिवली येथे रहाणारे व कामगार म्हणून काम करणारे श्री. प्रेमानंद लेसु नाईक व आई सौ.इंदू बाई यांचा सुपुत्र बाबू (लखन) प्रेमानंद नाईक याने खडतर परिस्थितीशी सामना करत घरातील हलाखीची परिस्थिती असताना जिद्द व चिकाटीच्या जोरावर आपले शिक्षण पूर्ण करून भारतीय सेनेत भरती झाल्याने त्याचे कर्जतमध्ये आगमनानंतर जल्लोषात स्वागत करण्यात आले , तर कर्जत खालापूर मतदार संघाचे कार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी पोसरी येथे शिवतीर्थावर बोलावून त्यांचा आदर सत्कार करत शुभेच्छा दिल्या.
प्रेमानंद नाईक हे कर्नाटक मधून पंधरा ते वीस वर्षांपूर्वी कर्जत मध्ये आले होते , त्या वेळी त्यांची खूप बिकट परिस्थिती होती , जे मिळेल ते काम लेबर सप्लायर करून घेत होते त्यांची राहण्याची देखील सोय नव्हती, रोडचे काम असल्यामुळे कधी रोडवर डबर टाकून खडी फोडणे , खडी रोडवर पसरविणे , रोडची साईड पट्टी भरणे , डांबर टाकणे अशाप्रकारे काम करत असल्यामुळे कधी कधी त्यांना सर्व लेबर सोबत घेऊन झोपडी मांडून रोडच्या साइटवर रहावे लागत असे,यामध्ये मुलांचे शिक्षण घेणे खूप कठीण जात होते , कधी या गावाला तर कधी त्या गावाला जाणे असल्यामुळे मुलांना जाण्या-येण्याचा त्रास होत असे , या गोष्टीचा विचार करून प्रेमानंद यांनी दहिवली येथे चार गुंठे जागा घेऊन एक घर बांधले व मुलांचे शिक्षण पूर्ण केले.
त्यांचा मुलगा बाबू याने पण जिद्द सोडली नाही . आपले शिक्षण एस एस डी पी डोंबे विद्यानिकेतन शाळा – दहिवली कर्जत येथे घेतले व पुढील १२ वी पर्यंत शिक्षण अभिनव ज्ञान मंदिर कर्जत येथे घेऊन बारावी कॉमर्स मधून चांगल्या प्रकारे गुण मिळवून आपल्या शाळेचे नाव उज्ज्वल केले आहे.बाबू नाईक यांनी भारतीय सेनेमध्ये अर्ज केला होता त्यात त्यांचा नंबर लागून त्यात भरती होऊन नाशिक येथे जाऊन एक वर्ष ट्रेनिंग घेतली व दि .०५ जानेवारी २०२२ रोजी ते कर्जत येथे आपल्या घरी आले व त्यांची ड्युटी पंजाब मधील पटियाला येथे फेब्रुवारी २०२२ पासून भारत मातेची सेवा करण्यास रुजू होणार आहे.
बाबू प्रेमानंद नाईक हे भारतीय सेनेमध्ये भरती होऊन कर्जत येथे आले हे समजतात कर्जत खालापूर मतदार संघाचे शिवसेनेचे कार्यसम्राट आमदार महेंद्रशेठ थोरवे यांनी आपल्या कार्यालयात शिवतीर्थावर बोलावून बाबू , त्यांचे वडील प्रेमानंद व आई इंदुबाई यांचा मोठ्या थाटामाटात शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार केले व बाबू यांस शुभेच्छा दिल्या.तर बाबू नाईक यांना त्यांचे कुटुंबातील सदस्य , मित्र सगेसोयरे व कर्जतकर यांनी स्वागत व शुभेच्छा दिल्या.
यावेळी कर्जत पंचायत समितीचे सभापती सौ .सुषमा ठाकरे , भानुदास ठाकरे , माजी उपसरपंच दिपक धुळे , सामाजिक कार्यकर्ते मिलिंद पाटील , आणि जय कामगार सेवा संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष राजेशजी चव्हाण , जिल्हाध्यक्ष ईश्वर भालेराव , सामाजिक कार्यकर्ते नेहरू चव्हाण , महाराष्ट्र ग्रामीण पत्रकार संघाचे रायगड जिल्हा अध्यक्ष कृष्णा सगणे , शैलेश खोब्रागडे यांनी कुमार बाबु प्रेमानंद नाईक यांचा सत्कार केला व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.