Wednesday, October 16, 2024
Homeमहाराष्ट्ररायगडडेक्कन एक्सप्रेस रेल्वेच्या रिझर्व्हेशन डब्ब्यांचा दर्जा घसरला !

डेक्कन एक्सप्रेस रेल्वेच्या रिझर्व्हेशन डब्ब्यांचा दर्जा घसरला !

साधी तिकीट काढून रिझर्व्हेशन डब्यात प्रवास करणाऱ्या प्रवाशांची ” दबंगगिरी ” वाढली, तिकीट तपासनीसकांचे व रेल्वे सुरक्षा बलाचे दुर्लक्ष..

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) रेल्वेचा कारभार दिवसेंदिवस ढासळत चालला असून रेल्वे गाडीत प्रवास करताना रिझर्व्हेशन करूनही रेल्वे डब्यात साधी तिकीट काढून प्रवास करणाऱ्या प्रवाशांची दबंगगिरी वाढत असल्याने रिझर्व्हेशन प्रवाश्यांना त्याचा त्रास सहन करावा लागत आहे . अश्या डब्यात चढून अतिरिक्त गर्दी होत असल्याने कुटुंबा समवेत रिझर्व्हेशन करून प्रवास करताना भांडणे होत असून आता हा प्रवास ” गुद्द्यावर ” येत असल्याने रेल्वे डब्यातील तिकीट तपासनीस व प्रवाशांची सुरक्षा करणारे रेल्वे सुरक्षा बल नक्की काय कर्तव्य बजावतात ? यावर आता प्रश्न चिन्ह निर्माण होत असून पुण्यावरून सुटणाऱ्या डेक्कन एक्सप्रेस च्या गाडीत रिझर्व्हेशन न करता रिझर्व्हेशन डब्ब्यांत प्रवास करणाऱ्या प्रवाशांवर कारवाई का होत नाही , असा संतप्त सवाल रिझर्व्हेशन प्रवासी करताना दिसत आहेत.

रेल्वेने अनेक मेल गाड्या बंद केल्या आहेत , तर अनेक गाड्यांचे थांबे देखील वगळण्यात आल्याने पुण्यावरून सव्वा तीन वाजता निघणारी ” डेक्कन एक्सप्रेस ” हि सहा वाजता कर्जत येथे थांबते . या डेक्कन एक्सप्रेस गाडीचा पहिला डबा EV 1 आहे दुसरा डबा SLR आहे , शेवटचा डबा EOG आहे , डेक्कन एक्सप्रेसला एकूण 16 डबे आहेत , पाच जर्नल बोगी , पाच रिझर्व्हेशन बोगी आहे तर तीन एसी बोगी आहे. म्हणजे प्रवासी फक्त 13 डब्यामध्ये प्रवास करू शकतात , मात्र या डब्ब्यात रिझर्व्हेशन डब्ब्यात साधी तिकीट काढून प्रवास करणारे अनेक प्रवासी चढून हे डब्बे गर्दीचा उच्चांग गाठत असल्याने रिझर्व्हेशन करून प्रवास करणाऱ्या कुटुंबांना त्याचा नाहक त्रास होत आहे . कोणी काही बोलायला गेल्यावर ” मुद्दा सोडून , हि बाब गुद्यावर ” येत असल्याने रिझर्व्हेशन प्रवासी वर्गाची सुरक्षा धोक्यात आली आहे.
महिला वर्ग व बच्चे कंपनी तर तरुण – तरुणी बरोबर प्रवास करताना कुटुंब प्रमुख या सर्व बाबींचा विचार करून काहीही न बोलता त्रास सहन करून प्रवास करतात , मग आम्ही जादा पैसे देवून रिझर्व्हेशन करून प्रवास करण्याचा काय फायदा ? असा संतप्त सुर प्रवासी वर्गातून निघत आहे.

अश्या डब्ब्यात रेल्वेकडून ” सहा आकडी ” पगार घेणारे तिकीट तपासनीस यांची नेमणूक असूनही या गंभीर बाबीकडे , व साधी तिकीट काढून रिझर्व्हेशन डब्यात प्रवास करून रेल्वेला फसवणूक करणाऱ्या प्रवाशांकडे काणाडोळा करून कुठलीच दंडात्मक कारवाई करण्यात येत नसेल तर दिवसेंदिवस अश्या प्रवासी वर्गांची भिड चेपत असून आता तर रिझर्व्हेशन डब्ब्यात लोंढेच्या लोंढे चढून डब्बे हाऊसफुल होताना दिसत आहेत . त्याबरोबरच रेल्वे सुरक्षा बल होणाऱ्या शाब्दिक भांडणाकडे व होणाऱ्या हाणामारीकडे दुर्लक्ष करत असल्याने एखाद्याच्या जीवावर बेतन्याची घटना घडल्यास त्यास जबाबदार कोण ? असा संतप्त सवाल डेक्कन एक्सप्रेस मध्ये रिझर्व्हेशनने प्रवास करणारे प्रवासी करत आहेत.
यावर तातडीने कायदेशीर कारवाई होणे गरजेचे असून , असे रिझर्व्हेशन डब्ब्यात साधी तिकीट काढून प्रवास करणाऱ्या प्रवासी वर्गांवर दंडात्मक कारवाई व रेल्वेला फसवणूक करून त्यांच्यावर कारवाई न करणाऱ्या तिकीट तपासनीस व रेल्वे सुरक्षा बल जवानांवर कारवाई झाल्यास अश्या घटनांवर रोक लागू शकतो , व प्रवासी वर्ग सुखाने सुखरूप प्रवास करू शकतात . अन्यथा ” डेक्कन एक्सप्रेस गाडीचे ” रिझर्व्हेशन डब्बे बंद करून ते डब्बे साधे करावेत , म्हणजे जादा पैसे देवून आमची लुटमार होणार नाही , अश्या संतापजनक प्रतिक्रिया डेक्कन एक्सप्रेस मध्ये रिझर्व्हेशन करून प्रवास करणारे प्रवासी वर्ग देत आहेत.
- Advertisment -

You cannot copy content of this page