डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची 131 वी जयंती वाकसई येथे उत्सहात साजरी…

0
84
वाकसई : वाकसई भीम नगर येथील जनसेवा मित्र मंडळाच्या वतीने भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती उत्सहात संपन्न.

भीमराव रामजी आंबेडकर तथा डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म 14 एप्रिल, 1891 मध्ये झाला तर परी निर्वाण 6 डिसेंबर, 1956 मध्ये झाला. हे भारतीय  न्यायशास्त्रज्ञ, अर्थशास्त्रज्ञ, राजकारणी, तत्त्वज्ञ आणि समाजसुधारक होते. त्यांनी दलित बौद्ध चळवळीला प्रेरणा दिली आणि अस्पृश्य (दलित) लोकांविरुद्ध होणारा सामाजिक भेदभाव नष्ट करण्यासाठी चळवळ उभारली, तसेच महिलांच्या आणि कामगारांच्या हक्कांचे समर्थन केले.

ते ब्रिटिश भारताचे मजूरमंत्री, स्वतंत्र भारताचे पहिले कायदेमंत्री,  भारतीय संविधानाचे  शिल्पकार,  भारतीय बौद्ध धर्माचे  पुनरुज्जीवक होते. देशाच्या विविध क्षेत्रांत दिलेल्या योगदानामुळे त्यांना ‘आधुनिक भारताचे शिल्पकार’ किंवा ‘आधुनिक भारताचे निर्माते’ असेही म्हणतात.बाबासाहेब आंबेडकर यांनी कोलंबिया विद्यापीठ आणि लंडन स्कूल ऑफ इकॉनॉमिक्स या शिक्षण संस्थांमधून  अर्थशास्त्र  विषयात  पीएच.डी. पदव्या मिळविल्या तसेच त्यांनी कायदा,अर्थशास्त्र  आणि राज्यशास्त्र या विषयांवर संशोधन केले. त्यांच्या सुरुवातीच्या कारकिर्दीत, ते एक अर्थशास्त्रज्ञ,  प्राध्यापक  आणि वकील होते.

त्यानंतर त्यांनी सामाजिक व राजकीय क्षेत्रांत काम केले. ते भारताच्या स्वातंत्र्यासाठी प्रचारामध्ये व चर्चांमध्ये सामील झाले, वृत्तपत्रे प्रकाशित केली, दलितांसाठी राजकीय हक्कांचा व सामाजिक स्वातंत्र्याचा पुरस्कार केला, तसेच आधुनिक भारताच्या निर्मितीत मोलाचे योगदान दिले.इ.स.1956 मध्ये त्यांनी आपल्या अनुयायांसह  बौद्ध धर्म  स्वीकारला. धर्मांतरानंतर काही महिन्यांनीच त्यांचे निधन झाले. इ.स. 1990 मध्ये, त्यांना मरणोत्तर भारतरत्‍न हा भारताचा सर्वोच्च नागरी सन्मान प्रदान करण्यात आला.

त्यांचा जन्मदिवस दरवर्षी आंबेडकर जयंती म्हणून भारतासह जगभरात साजरा केला जातो.इ.स. 2012 मध्ये, “द ग्रेटेस्ट इंडियन” नावाच्या सर्वेक्षणात आंबेडकरांची ‘सर्वश्रेष्ठ भारतीय’ म्हणून निवड करण्यात आली आहे. आंबेडकरांच्या स्मरणार्थ अनेक स्मारके आणि चित्रणे लोकसंस्कृतीत उभारली गेली आहेत.भारतातील वर्गलढ्याला आणि जातीअंताच्या लढ्याला आकार आणि दिशा देण्याचे भरीव काम डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी केले. जागतिक पातळीवर शोषण मुक्ती आणि समतेसाठीच्या लढ्यांमध्येही बाबासाहेब आंबेडकर प्रेरणादायी ठरले आहेत. जगाच्या इतिहासात असे योगदान करणाऱ्या अत्युच्च पातळीवरच्या निवडक व्यक्तींमध्ये बाबासाहेबांचे स्थान आहे, असे डॉ. गेल ऑमवेट  सांगतात. सामाजिक सुधारणा क्षेत्राच्या संदर्भात विशेषतः वर्ग, जात, धर्म, लिंग ह्यांचा भेदभाव न करता सर्व नागरिकांना समान अधिकार यासाठी आंबेडकरांनी काम केले.

त्यांनी वेगवेगळ्या जातीतल्या लोकांमधली दरी मिटण्यासाठी तीन महत्त्वाच्या मार्गांचा उल्लेख केला होता – लग्न, खानपान आणि सांस्कृतिक मिलाप. आंबेडकरांना बालपणापासून अस्पृश्येचा सामना करावा लागला.इ.स. 1935 या कालावधी दरम्यान लिहिलेल्या वेटिंग फॉर अ व्हिझा या आपल्या आत्मकथेत आंबेडकरांनी अस्पृश्यतेसंबंधी त्यांना आलेल्या कटु अनुभवांच्या आठवणींच्या नोंदी केलेल्या आहेत.

हे आत्मचरित्रपर पुस्तक कोलंबिया विद्यापीठात  ‘पाठ्यपुस्तक’ म्हणून वापरले जाते.राजकीय स्वातंत्र्य आधी की सामाजिक सुधारणा हा टिळक व आगरकर यांच्यातील वाद डॉ. आंबेडकरांच्याही मनात चालत होता. स्वातंत्र्योत्तर भारतात तत्कालीन अस्पृश्यांच्या स्वातंत्र्याला काहीच किंमत नसेल, तर त्यातून अधिक गुंतागुंतीच्या समस्या निर्माण होतील. तसे होऊ नये यासाठी बाबासाहेबांनी सामाजिक सुधारणा व अस्पृश्यता निर्मूलन ही कार्ये करण्याला अधिक प्राथमिकता दिली.

बाबासाहेब आंबेडकर भारतातील ब्रिटिश सत्तेचे सुद्धा विरोधक होते.अशा या मानवाच्या 131 व्या जयंती निमित्त रात्री 12 वाजता केक कापून जन्मदिन साजरा करण्यात आला तसेच येथील बुद्ध विहाराला मोहक अशी दिव्य रोषणाई करण्यात आली. वाकसई फाटा ते बुद्ध विहार या रस्त्याच्या कडेने सर्वत्र निळे झेंडे लावून सर्वत्र जणू काही निळे अवकाश जमिनीवर उतरले होते.14 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता वाजत गाजत डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची भव्य मिरवणूक काढण्यात आली.

यावेळी सर्व जनसेवा मंडळाचे कार्यकर्ते व भीम नगर मधील महिला भगिनी आणि लहानांनी मोठी गर्दी केली होती.यंदाची जयंती ही गटा तटाची नसून त्या महामानवाची आहे असा निश्चय करून डॉ बाबासाहेब आंबेडकरांचे विचार व समाजासाठी त्यांचे बलिदान लक्षात घेऊन एकत्रित व उत्साही वातावरणात आणि शांततेत जनसेवा मंडळाने ही जयंती साजरी केली.यासाठी वाकसई ग्रामस्थांचे व लोणावळा ग्रामीण पोलिसांचेही विशेष सहकार्य लाभले.