भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) अनेक वर्षांपासून समस्यांनी ग्रासलेल्या कर्जत नगर परिषद हद्दीतील भिसेगाव प्रभागातील आदिवासी वाडीतील प्रलंबित प्रश्न घेवून आंदोलन छेडणारे सामाजिक कार्यकर्ते तथा माहिती अधिकार कर्जत शहर अध्यक्ष अमोघ कुळकर्णी यांनी आदिवासी बांधवांच्या ” न्याय हक्कासाठी ” आंदोलन छेडले होते . असलेल्या समस्या तडीस न लावल्यास प्रसंगी लोकसभेच्या निवडणूक मतदानावर ” बहिष्कार ” टाकण्याच्या , या निर्णयाने त्याचे पडसाद रायगड जिल्हाधिकारी कार्यालया पर्यंत पोहचल्याने शासकीय यंत्रणा जागी होवून आज कर्जतचे तहसीलदार शीतल रसाळ व पालिकेचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी तातडीने भिसेगाव आदिवासी वाडीला भेट दिली . त्यामुळे आंदोलनकर्ते अमोघ कुळकर्णी यांच्या प्रयत्नांना यश आले आहे.
आज भिसेगाव येथील आदिवासी वाडी मध्ये कर्जतचे तहसीलदार शितल रसाळ तसेच कर्जत नगर परिषदचे मुख्याधिकारी वैभव गारवे यांनी आदिवासी वाडीतील समस्या जाणून घेण्यासाठी भेट दिली. यावेळी या आदिवासी वाडीमध्ये आदिवासींची घरे नावावर करण्याबाबत शबरी योजना राबविणे , विधवा महिलांना तसेच वृद्ध यांना पेन्शन (संजय गांधी निराधार) योजना व ज्या काही शासकीय योजना आहेत ते या आदिवासी बांधव व महिलांसाठी राबविण्यात यावे तसेच जातीचे दाखले त्यांना तात्काळ देण्यात यावे , आदिवासी वाडीमध्ये गटारे , पाणी , रस्ते , विद्युत पोल यांची कामे करून देण्याबाबत आश्वासन अधिकारी वर्गाने दिले.
यावेळी हे आश्वासन लेखी स्वरूपात देण्यात यावे , अशी विनंती सामाजिक कार्यकर्ते अमोघ कुळकर्णी यांनी केली . लोकसभा निवडणूक होण्याच्या आधी जेवढी कामे करता येईल ते करून द्या , तरच आम्ही मतदान करू. नाहीतर जो पर्यंत कामे होणार नाहीत तो पर्यंत मतदानावर बहिष्कार असणार आहे , असे आदिवासी बांधव व महिला वर्गाने सांगितले . यावेळी भिसेगाव तसेच गूंडगे आदिवासी महिला व बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते . त्याचप्रमाणे अधिकारी वर्गाबरोबर मा. नगरसेवक सोमनाथ ठोंबरे , सामाजिक कार्यकर्ते अमोघ कुळकर्णी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.