तीन महिन्यात उर्से टोल नाका बंद झाला नाही तर आक्रमक आंदोलन करू, किशोर आवारे !

0
232

मावळ : केंद्रीय रस्ते वाहतूक व विकास मंत्री नितीन गडकरी यांनी 60 किलोमीटरच्या अंतरामध्ये जर दोन टोल नाके येत असेल , तर तीन महिन्याच्या आत टोल नाका बंद करण्यात येईल असे लोकसभेमध्ये जाहीर केले.

सोमाटणे फाटा येथील टोलनाका बंद करण्यासाठी जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे व सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर हे जानेवारी 2021 पासून न्यायालयीन मार्गाने व लोकशाही मार्गाने प्रयत्न करत आहेत . केंद्रीय रस्ते विकास व वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांच्या घोषणेनंतर सोमाटणे फाटा येथील टोल नाका लवकरच बंद होईल असा विश्वास स्थानिकांच्या मनात निर्माण झाला असून जोपर्यंत येथील टोल नाका बंद होणार नाही , तोपर्यंत कायदेशीर मार्गाने सुरू असलेली ही लढाई बंद होणार नाही अशी माहिती यावेळी पत्रकार परिषदेत देण्यात आली.

सन 2004 साली हा टोलनाका सुरू करण्यात आला . सन 1997 साली व सन 2008 साली झालेल्या शासन निर्णयानुसार हा टोलनाका बेकायदेशीर आहे .1997 च्या नियमानुसार दोन टोलनाक्या मधील अंतर हे किमान 80 कि. मी.असावे तर 2008 च्या नियमानुसार दोन टोलनाक्या मधील अंतर हे 60 कि.मी. असावे.

सोमाटणे फाटा येथील टोलनाका हा लोणावळा येथील टोल नाक्यापासून अवघ्या 32 किलोमीटरवर व खेड शिवापूर येथील टोलनाक्यापासून 52 किलोमीटरवर आहे . तसेच या टोल नाक्यावर सुमारे 1461 कोटीचे वसुलीचे लक्ष होते . परंतु 2019 पर्यंत या टोलनाक्यावरून 2021 ते 2022 कोटी रुपये टोल वसूल झाला असताना देखील या टोलनाक्याला पुन्हा 10 वर्षांकरिता मुदतवाढ मिळाली .वरील सर्व बाबी लक्षात घेता सोमाटणे टोलनाका हा बेकायदेशीर असून स्थानिकांची या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर लूट केली जात असल्याने हा टोलनाका त्वरित बंद करण्यात यावा अशी मागणी या वेळी पत्रकार परिषदेमध्ये करण्यात आली.

यावेळी जनसेवा विकास समितीचे अध्यक्ष किशोर आवारे,सजग जागृत मंचचे अध्यक्ष विवेक वेलणकर , मिलिंद अच्युत , सुनील मोरे , कल्पेश , अविनाश बोडके आदी उपस्थित होते.

यावेळी जनसेवा विकास समितीचे संस्थापक अध्यक्ष किशोर आवारे पत्रकार परिषदेत म्हणाले , ज्या प्रमाणे लोकसभेमध्ये केंद्रीय रस्ते वाहतूक विकास मंत्री नितीन गडकरी यांनी दोन टोलनाक्या मधील अंतर हे किमान 60 किलोमीटर असावे असे सांगितले , त्यानुसार सोमाटणे येथील टोल नाका उद्यापासूनच बंद झाला पाहिजे अशी आमची मागणी आहे . या तीन महिन्यात जर तो बंद झाला नाही तर आम्ही आक्रमक आंदोलन करू आम्ही सर्वसामान्यांना घेऊन टोल नाक्यावर न भुतो न भविष्य असा मोर्चा काढणार आहोत.

तसेच टोलनाक्यावरील स्थानिक कोणाला तरी हाताशी धरायचं त्याला मलिदा द्यायचा आणि सर्वसामान्यांची लूट करायची हे आता मान्य होणार नाही आम्ही यामध्ये आक्रमक आंदोलन करू असे आवारे म्हणाले .सजग नागरिक मंचाचे अध्यक्ष विवेक वेलणकर म्हणाले , फेब्रुवारी 2022 मध्ये सोमाटणे टोलनाक्या वरून 3 लाख 21 हजार वाहने धावली . त्यातून 3 कोटीचा टोल गोळा झाला . त्याबरोबरच 3 लाख 6 हजार वाहने टोल न देता गेली.

टोल चुकून एवढ्या मोठ्या प्रमाणात वाहने पळून जाऊ शकतात , हा एक मोठा संशोधनाचा भाग असून दुर्दैव असे की सरकार ही सर्व आकडेवारी स्वतःच्या वेबसाईटवर टाकते . परंतु याची कुठल्याही प्रकारची शहानिशा करत नाही . हीच गोष्ट आम्ही दोन महिन्यापूर्वी एक्सप्रेसवेच्या बाबत दाखवून दिली . तसेच या ठिकाणाहून दररोज सुमारे 11 हजार वाहने टोल न देता जातात असे कॉन्ट्रॅक्टर सांगतो व सरकार डोळे झाकून ती आकडेवारी वेबसाईट वर प्रसारित करते . या सर्व प्रकाराची सीबीआय मार्फत चौकशी व्हावी अशी मागणी देखील विवेक वेलणकर यांनी या पत्रकार परिषदेत केली.