
मुंबई – दलित पॅंथरच्या स्थापनेला 9 जुलै रोजी 50 वर्षे पूर्ण होत आहेत दलित पॅंथर च्या सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त संपूर्ण महाराष्ट्र राज्यात दलित पॅंथर चा सुवर्ण महोत्सव साजरा करणार असल्याची घोषणा आज रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी बांद्रा येथील वोक्हार्ट हॉलमध्ये जाहीर केले.
दलित पॅंथर सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त राज्यभरातील विचारवंत साहित्यिक आणि पॅंथर कार्यकर्त्यांची महत्वपूर्ण बैठक आयोजित करण्यात आली होती. त्यात सर्वसंमतीने दलित पॅंथर सुवर्ण महोत्सव समिती स्थापन करण्यात आली .
यावेळी नामदार रामदास आठवले यांच्यासह अविनाश महातेकर, अर्जुन डांगळे, माजी मंत्री चंद्रकांत हंडोरे, बबन कांबळे, राही भिडे, दिलीप जगताप, सुरेश केदारे, गौतम सोनवणे, प्रेम गोहिल,सुरेश सावंत, सुखदेव सोनवणे,विजय साबळे आदी अनेक मान्यवर उपस्थित होते
येत्या दिनांक 9 जुलै रोजी दलित पॅंथर चा सुवर्ण महोत्सव सोहळा साजरा करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला तसेच राज्यात उत्तर पश्चिम महाराष्ट्र कोकण विदर्भ मराठवाडा सर्व विभागात विभागीय कार्यक्रम घेऊन दलित पॅंथरचा सुवर्णमहोत्सव साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला. यानिमित्त दलित पॅंथर चे प्रमुख नेते, कार्यकर्ते यांचा सन्मान तसेच जे पॅंथर कार्यकर्ते निवर्तले आहेत त्यांच्या कुटुंबियांचा सन्मान दलित पॅंथर सुवर्ण महोत्सव समितीतर्फे करण्याचा निर्णय या बैठकीत घेण्यात आला आहे.दलित पॅंथर चा सुवर्ण महोत्सव समग्र आंबेडकरी चळवळीच्या वतीने सर्वांना सोबत घेऊन साजरा करण्याचा निर्णय घेण्यात आला.
दलित पॅंथर अन्यायाचा प्रतिकार करणारे ऐतिहासिक संघटन ठरले आहे. दलित पॅंथर मुळे प्रेरणा घेऊन देशभर दलितांसाठी अनेक संघटना निर्माण झाल्या. दलित पॅंथर हे तरुणांना अन्यायाचा प्रतिकार शिकविणारे, न्यायासाठी लढा शिकविणारी प्रेरणादायी संघटना आहे . त्यामुळे दलित पॅंथर चा सुवर्ण महोत्सव साजरा करून अन्यायाविरुद्ध च्या आक्रमकतेला दलित तरुणांमधील लढाऊ वृत्तीला प्रेरणा देत राहावे यासाठी ऐतिहासिक ठरलेल्या दलित पॅंथर चा सुवर्ण महोत्सव साजरा करणे आम्हाला महत्त्वाचे वाटते असे नामदार रामदास आठवले यावेळी म्हणाले.