दहा ते बारा अज्ञातांकडून धारदार शस्त्राने वडगाव येथील तरुणाची हत्या…

0
73

वडगाव मावळ : अज्ञात 10 ते 12 जणांच्या टोळक्याकडून धारदार शस्त्राने एका तरुणाची हत्या केल्याची घटना वडगाव मावळ हद्दीतील मातोश्री हॉस्पिटल जवळ बस स्टॉप समोर दि.13 रोजी रात्री 12:30 वाजण्याच्या सुमारास घडली. सदर घटनेची वार्ता समजताच संपूर्ण मावळात खळबळ निर्माण झाली आहे.

विश्वजित राजेंद्र देशमुख (वय 22 वर्षे, रा. संस्कृती सोसायटी वडगाव ता.मावळ जि.पुणे ) असे मयत झालेल्या तरुणाचे नाव असून. याबाबत महेश उर्फ माऊली काशिनाथ गायकवाड ( वय 28 वर्ष, रा. वारंगवाडी, आंबी, ता. मावळ, जि. पुणे ) यांनी वडगाव मावळ पोलीस स्टेशनमध्ये फिर्याद दिली आहे. सदर फिर्यादेवरून अज्ञात 10 ते 12 इसमांविरुद्ध गु. र. नं. 117/2022 भा. द. वी. क. 302,307,143,147,148,149 सह हत्यार कायदा क.4(27) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार दि. 13/06/2022 रोजी रात्री 12:30 वा.च्या सुमारास वडगाव गावच्या हद्दीत मातोश्री हॉस्पिटल जवळ बस स्टॉप समोर रोडवर पुर्वी झालेल्या कुठल्यातरी भांडणाचे वैर मनात धरून 10 ते 12 अनोळखी इसमांनी मोटार सायकलवर येवुन त्यांच्या हातातील लोखंडी कोयते व तलवारीने विश्वजीत याच्या डोक्यात व पाठिवर वार करून त्यास जिवे ठार मारले. तसेच सदरची भांडणे सोडविण्यास गेलेल्या फिर्यादी आणि अभिजित ढोरे यांच्यावर सुध्दा आरोपींनी कोयत्याने व तलवारीने वार करून त्यांना जिवे ठार मारण्याचा प्रयत्न केला आणि वाहनांची तोडफोड केली असल्याची फिर्याद दाखल करण्यात आली असून त्याबाबत अनोळखी 10 ते 12 इसमांविरूध्द गुन्हा दाखल करून वर्दी रिपोर्ट मा. प्रथमवर्ग न्यादंडाधिकारी वडगाव मावळ यांना रवाना करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक भोसले हे करत आहेत.