Friday, June 9, 2023
Homeपुणेमावळदहा दिवसांत अनाधिकृत बांधकाम काढून घेणार या आश्वासनानंतर कार्ला ग्रामस्थांचे उपोषण मागे…

दहा दिवसांत अनाधिकृत बांधकाम काढून घेणार या आश्वासनानंतर कार्ला ग्रामस्थांचे उपोषण मागे…

कार्ला (प्रतिनिधी):कार्ला गावातील जमिन गट नं. 148 मधील अनाधिकृत व बेकायदेशीर बांधकाम तात्काळ काढा या मागणीसाठी कार्ला ग्रामस्थांकडून काल पासून आमरण उपोषण सुरु करण्यात आले होते. आज मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे व कार्ला ग्रामपंचायतीने सदरचे अनाधिकृत बांधकाम येत्या दहा दिवसात काढून घेण्याची नोटीस दिल्यानंतर सदरचे उपोषण मागे घेण्यात आले.
कार्ला ग्रामस्थ भाऊसाहेब हुलावळे, गणेश वायकर, समीर हुलावळे, अनिल हुलावळे, सुखदेव हुलावळे, योगेश हुलावळे, विनोद हुलावळे हे उपोषणास बसले होते. तहसिलदारांच्या हस्ते उपोषणकर्त्यांना पाणी पाजून उपोषण सोडविण्यात आले.
गावातील गट नं. 148 मध्ये अस्तित्वात असलेल्या मस्जिद च्या मागील जागेत अनधिकृतरित्या बेकायदेशीर इमारतीचे बांधकाम करण्यात आले आहे. जुन्या मस्जिद ला ग्रामस्तांचा विरोध नसून मागे बेकायदेशीरपणे बांधलेल्या बांधकामाला ग्रामस्तांचा विरोध आहे. हे बांधकाम तात्काळ काढा असा ठराव कार्ला ग्रामसभेने 26 जानेवारी रोजी करत तो अंमलबजावणीसाठी पीएमआरडीए कडे पाठविण्यात आला होता. मात्र कारवाई न झाल्याने हे उपोषण सुरु करण्यात आले होते. सदरची जागा ही गायरान असल्याने त्यावरील अतिक्रमण काढण्याची जबाबदारी जिल्हाधिकारी अर्थात महसुल विभागाची असल्याने मावळचे तहसीलदार मधुसूदन बर्गे यांच्या आदेशाने कार्ला ग्रामपंचायतीने सदरचे बांधकाम दहा दिवसात स्वखर्चाने काढण्याची नोटीस बांधकाम करणाऱ्यांना बजावली आहे. त्यांच्या अश्वासनानंतर आज आमरण उपोषण मागे घेण्यात आले.
दोन दिवसात कार्ला परिसरातील विविध ग्रामपंचायती, सरपंच, उपसरपंच, सदस्य, सर्व पक्षीय पदाधिकारी, बजरंगदल मावळ, विश्वहिंदू परिषद, हिंदू समिती लोणावळा शहर व ग्रामीण, मावळ तालुका वारकरी संप्रदाय, अण्णा हजारे भ्रष्टाचार निर्मूलन समिती मावळ तालुका, तसेच लोणावळा शहर पत्रकार संघ यांच्यासह अनेकांनी उपोषणाला पाठिंबा दिला होता.

You cannot copy content of this page