आरपीआय कर्जत तालुका महिला अध्यक्षा ” अलका सोनावणे ” यांचा यशस्वी पाठपुरावा…
भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे )कर्जत नगर परिषद हद्दीतील दहिवली प्रभागातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर नगर येथे गेली महिन्यापासून पाणी पुरवठा कमी दाबाने व अपुऱ्या स्वरूपात होत होता . यामुळे याचा दैनंदिन कामकाजावर परिणाम होत असल्याने येथील महिला वर्गात संताप खदखदत होता.
याबाबत येथील रहिवासी सर्व महिला वर्गाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया ( आठवले ) महिला आघाडीच्या कर्जत तालुका अध्यक्षा सौ.अलका प्रकाश सोनावणे यांच्या हि गंभीर बाब निदर्शनास आणून दिल्यावर त्यांच्या नेतृत्त्वाखाली दि.१५ एप्रिल २०२४ रोजी कर्जत नगरपरिषदेला निवेदन दिले होते . सदर पाणी पुरवठा सुरळीत न झाल्यास तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा दिल्याने पालिका प्रशासनाने त्वरित यावर कार्यवाही करून पाणी पुरवठा सुरळीत केला असून आरपीआयच्या या आंदोलनाला यश आले आहे.
आर पी आय कर्जत तालुका महिला अध्यक्षा सौ. अलका सोनावणे यांच्या तीव्र आंदोलनाच्या पावित्र्यामुळे कर्जत नगरपरिषद प्रशासनाने डॉ.बाबासाहेब आंबेडकर नगर प्रभागासाठी दररोज दोन तास म्हणजेच सायंकाळी ७ – ३० ते ९ – ३० असा विशेष पाणीपुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे. शनिवार दि.२० एप्रिल २०२४ रोजी पाणीपुरवठा सुरळीत व जास्त दाबाने येण्यास सुरुवात झाली.
येथील पाण्याची पाईप लाईन हि कमी व्यासाची असल्याने मोठी पाईप लाईन व नवीन साठवण टाकी बांधण्याची मागणी अध्यक्षा सौ. अलका सोनावणे यांनी केली आहे . पाणीपुरवठा सुरळीत होण्यासाठी कर्जत नगरपरिषदेच्या मा. अध्यक्षा सौ.सुवर्णा जोशी, पाणीपुरवठा विभागाचे श्री.विलास गायकवाड, श्री.दिलीप लाड यांनी विशेष प्रयत्न केले. तसेच नगरपरिषदेचे मुख्याधिकारी श्री.वैभव गारवे यांनी देखील विशेष लक्ष देऊन, सौ.अलका सोनावणे यांच्याशी फोनद्वारे चर्चा करून पाणी पुरवठा सुरळीत होत असल्याबाबत विचारपूस केली.
पाणी जास्त दाबाने व सुरळीत होवू लागल्याने याबद्दल सर्व दहिवली ग्रामस्थ महिलांनी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाच्या महिला अध्यक्षा सौ. अलका सोनावणे आणि कर्जत नगरपरिषद प्रशासनाचे आभार व्यक्त केले.