मावळ (प्रतिनिधी):वडगांव नगरपंचायतिच्या वतीने मावळ दुर्गा अभियान या मोफत स्वसंरक्षण प्रशिक्षणाचे महिला दिनी शस्र पूजन करून उदघाटन करण्यात आले.या स्वसंरक्षण प्रशिक्षणाचा शुभारंभ वडगाव मधील पंचमुखी मारुती मंदिर परिसर आणि कातवी येथील मारुती मंदिर परिसरात नगराध्यक्ष मयूर ढोरे यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होऊन या स्वसंरक्षण प्रशिक्षणास सुरूवात करण्यात आली.
वडगांव शहरातील प्रशिक्षणार्थी यांच्यासाठी पंचमुखी मारुती मंदिर परिसरात दररोज सांयकाळी ठीक 5 वाजता,तर कातवी येथील मारुती मंदिर परिसरात दररोज दुपारी 4 वाजता स्वसंरक्षण प्रशिक्षणाचे धडे शिकवले जाणार आहेत.
सुरू झालेल्या या स्वसंरक्षण प्रशिक्षणात शहरातील जवळपास 45 ते 50 मुली सहभागी झाल्या आहेत.संरक्षण प्रशिक्षणात सहभागी झालेल्या सर्व मुलींना आपापल्या पालकांनी वेळेवर वरील ठिकाणी पोहचते करून तसेच प्रशिक्षण संपल्यावर घरी सुखरूप घेऊन जावे. प्रशिक्षणार्थींनी कोणतीही मौल्यवान वस्तू सोबत आणू नये. प्रशिक्षणार्थी मुलींनी येताना सलवार कुर्ता परिधान केलेला असावा. तसेच येताना सोबत पाणी बॉटल घेऊन येणे इत्यादी सूचना उपस्थित असलेल्या प्रशिक्षणार्थीं आणि पालकांना नगराध्यक्ष मयूर ढोरे यांनी केल्या.
यावेळी नगराध्यक्ष मयूरदादा ढोरे, प्रशिक्षक किरण आडगळे, शहर समन्वयक अधिकारी दिगंबर बांडे आणि प्रशिक्षणार्थी तसेच पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.