देहूरोड व लोणावळ्यातील अनेक काँग्रेस कार्यकर्त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश !

0
271

मावळ दि.21: मावळातील लोणावळा व देहूरोड येथील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह आज मुंबई येथील शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादीच्या प्रदेश कार्यालयात राज्याचे गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड , आमदार सुनिल शेळके व मावळ तालुका राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष गणेश खांडगे यांच्या उपस्थित राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात जाहीर प्रवेश केला आहे .

लोणावळा नगरपरिषद व देहूरोड कॉन्टोन्मेट बोर्डच्या निवडणुका तोंडावर आल्या असताना ऐनवेळी लोणावळा व देहूरोड येथील काँग्रेसच्या पदाधिकाऱ्यांसह शेकडो कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्याने मावळात काँग्रेसला मोठे खिंडार पडले आहे . यामुळे मावळातील राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची ताकद वाढली असून आगामी निवडणुकांमध्ये लोणावळा व देहूरोड येथे राष्ट्रवादीस एक हाती सत्ता प्रस्थापित करणे सोपे होणार आहे .

लोणावळा नगरपरिषदेत यापूर्वी भाजप आणि काँग्रेस यांच्या युतीतुन सत्ता प्रस्थापित झाली होती . मात्र आमदार शेळके यांनी लोणावळ्यातील काँग्रेस पदाधिकाऱ्यांसह कार्यकर्त्यांना देखील राष्ट्रवादीत घेतल्याने याचा भाजपला मोठा फटका बसणार आहे .

यावेळी काँग्रेसचे लोणावळा शहर माजी उपनगराध्यक्ष व माजी लोणावळा शहराध्यक्ष विलास बडेकर , माजी उपनगराध्यक्ष संजय घोणे , काँग्रेस कामगार आघाडी अध्यक्ष फकीर गवळी , काँग्रेस लोणावळा शहर उपाध्यक्ष राजू तिकोने , काँग्रेसचे जेष्ट नेते प्रकाश हरपुडे , माजी शिक्षण मंडळ सदस्य पांडुरंग घर्डे तसेच काँग्रेस आयचे देहूरोड शहर कार्याध्यक्ष दीपक बाबुराव चौगुले , काँग्रेस आय देहूरोड शहर युवकाध्यक्ष संदीप रामकिसन डुगळज , भारतीय वाल्मीकी समाज उपाध्यक्ष संदीप सुरेश बोथ , काँग्रेस अल्पसंख्यांक सेल मावळ उपाध्यक्ष इस्माईल इब्राहीम शेख, लोणावळा शहराध्यक्ष जीवन गायकवाड , देहूरोड शहर अध्यक्ष प्रवीण झेंडे , लोणावळा महिला शहराध्यक्ष उमा मेहता , माजी नगरसेवक आरोही तळेगावकर , माजी शहराध्यक्ष कृष्णा दाभोळे , दीपक हुलावळे , उद्योजक नंदकुमार वाळंज आदि कार्यकर्ते उपस्थित होते.