नंदुरबार (प्रतिनिधी) : केवळ कागदावर सुरू नंदुरबारातील इकरा एज्युकेशन सोसायटी संचलित सैय्यद शेरे अबुल गाझी मियाँ उर्दू प्राथमिक शाळेची मान्यता काढून घेण्याची शिफारस जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागाने शिक्षण संचालकांकडे केली आहे.
नंदुरबार येथील ही शाळा केवळ कागदावर सुरू असून त्याची चौकशी करावी, अशी मागणी नंदुरबार येथील अमजदखान मोहम्मद खान यांनी शिक्षण विभागाकडे केली होती. त्यानुसार प्राथमिक शिक्षणाधिकारी सतीश चौधरी यांनी तीन अधिकाऱ्यांची चौकशी समिती स्थापन करून चौकशीच्या सूचना दिल्या होत्या. त्यानुसार गटशिक्षणाधिकारी नीलेश पाटील, नगरपालिका शिक्षण मंडळ प्रशासन अधिकारी भावेश सोनवणे, पालिका शाळा प्रभारी केंद्र प्रमुख रणजीत नाईक यांनी चौकशी केली.15 डिसेंबर 2022 रोजी समितीने दुपारी 1 वाजता शाळेला भेट दिली असता शाळा बंद आढळून आली.
जागेवर शाळेच्या नावाचा कोणताही फलक आढळून आला नाही.तसेच परिसरात चौकशी केली असता कधी कधी शाळा उघडत असल्याचे सांगण्यात आले. परंतु शाळेची निश्चित खात्रीशीर माहिती मिळाली नाही. मुख्याध्यापक व शिक्षकांशी संपर्क करण्याचा प्रयत्न केला असता दोन व्यक्ती उपस्थित झाले. परंतु त्यांना शाळेविषयी माहिती देता आली नाही. पुन्हा 16 डिसेंबर 2022 रोजी सकाळच्या सत्रात भेट दिली असता त्या दिवशी देखील शाळा बंद आढळून आली नसल्याचे त्रिसदस्यीय अहवालात नमूद करण्यात आले आहे.
त्यानुसार शिक्षणाधिकारी सतीष चौधरी यांनी शिक्षण उपसंचालकांकडे या शाळेची मान्यता रद्द करण्याची शिफारस करण्याचे पत्र पाठविले आहे.दरम्यान, शिक्षण विभागाच्या दस्ताऐवजनुसार या शाळेला अद्याप कोणतेही अनुदान शासनाकडून प्राप्त झाले नसल्याचेही स्पष्ट झाले आहे.त्यामुळे आता या उर्दू शाळेची मान्यता रद्द होणार की नाही याकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.
दरम्यान नंदुरबार प्राथमिक शिक्षणाधिकारी सतीश चौधरी यांना याबाबत विचारना केली असता “आलेल्या तक्रारीनुसार शाळेची चौकशी करण्यात आली. समितीने दिलेल्या अहवालानुसार शाळेची मान्यता रद्द करण्याचा प्रस्ताव प्राथमिक शिक्षण संचालकांकडे पाठविण्यात आला असल्याचे सांगण्यात आले.