निकृष्ठ दर्जाच्या गणवेश वाटप घोटाळ्याची चौकशी करून त्यात सहभागी असलेल्या सर्वांवर गुन्हे दाखल करा – ऍड .कैलास मोरे..

0
202

भिसेगाव- कर्जत (सुभाष सोनावणे )रायगड जिल्हा परिषदेच्या शाळेत आता पहिल्या सारखी विद्यार्थ्यांची हजेरी राहिली नाही . काही शाळा तर बंद होण्याच्या मार्गावर असून मग शिक्षक वर्ग पाच आकडी पगार घेत असताना नक्की काय करतात , हा गहन प्रश्न निर्माण होत असताना आता कर्जत तालुक्यात निकृष्ठ दर्जाचे गणवेश वाटप होत असून त्यात लाखो रुपयांचा भ्रष्टाचार झाल्याचा आरोप करत सम्यक विद्यार्थी आंदोलनाचे महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष ऍड . कैलास मोरे यांनी या भ्रष्टाचारात सहभागी असलेल्या शिक्षक व राजकीय नेते या सर्वांवर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्याचे लेखी निवेदन राजिपचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांना दिले आहे.

शासनाकडुन जिल्हयातील शासकीय व स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळांमधील विद्यार्थ्यांना मोफत गणवेश वाटप केले जाते.सदरचे गणवेशाची रक्कम जिल्हास्तरावरून शाळा व्यवस्थापन कमिटीच्या खात्यावर जमा केली जात असते.यानुसार मिळालेल्या माहितीवरून जिल्हयातील सर्व तालुक्यात विशेषकरून कर्जतमधील प्रशासकीय अधिकारी यांनी सर्व शिक्षकांना तोंडी आदेश दिलेले आहेत की, “ सदरचे गणवेश जिल्हयाकडुन ( विशिष्ठ ठेकेदारांच्या मार्फत ) दिले जाणार आहेत , तर तुम्ही सर्व शिक्षकांनी व व्यवस्थापन समितीने त्या विशिष्ठ ठेकेदारांकडूनचं घ्या.” आणि महत्वाचं म्हणजे शासनाकडुन अनुदान वाटप होणे अगोदर सदरचे गणवेश वाटप सुद्धा करणेत आले आहेत.

मा.मुख्य कार्यकारी अधिकारी, रायगड यांनी मोफत गणवेश वाटप करणे, त्यासाठी लागणारी रक्कम तसेच कशाप्रकारे गणवेश खरेदी करावे, कुणी करावे याबाबतचे स्पष्ट निर्देश आपल्या कार्यालयाकडुन दिलेले असताना जिल्हयातील अनेक शाळांकडून विशेष करून कर्जतमध्ये चुकीच्या पद्वतीने गणवेश वाटप केले आहेत.ज्यामध्ये खुप मोठा घोटाळा झाल्याचे या परिस्थितीतुन दिसून येत आहे. कर्जतचे प्रशासकीय अधिकारी, केंद्रप्रमुख यांनी वरीष्ठांची भिती दाखवुन त्यांच्या म्हणण्याप्रमाणे विशिष्ठ ठेकेदाराला गणवेश वाटप करणेसाठी जबरदस्ती केली आहे.

ज्यामध्ये काही ठिकाणी गणवेश वाटप केल्यानंतर ठेका देणेचा ठराव घेणेत आलेला आहे . अशी अनेक नियमबाहय गणवेश वाटपाची प्रकरणे समोर आली आहेत.वास्ताविक अशा प्रकारे गणवेश वाटप करणेचा आणि ठेका देण्याचे शासनाच्या नियमावलीत नाही तसेच गणवेशाचा दर्जा इतका निकृष्ठ आहे की सदरचा दिलेला गणवेश हा २ महिने सुद्धा टिकणारा नाही.

त्यामुळे निवेदनामार्फत मागणी करण्यात आली की, गणवेश वाटपामध्ये संपुर्ण जिल्हयात विशेष करून कर्जतमध्ये जे नियमबाहय गणवेश वाटप झाले आहे ,त्याची त्वरीत चौकशी करावी आणि संबंधितांवर गुन्हा दाखल करणेचे आदेश दयावेत , तसेच तोपर्यंत कुठल्याही प्रकारचे गणवेशाची रक्कम कुठल्याही शाळेला व ठेकेदाराला देणेत येऊ नये.या गंभीर प्रकरणात निवेदनाची कुठल्याही प्रकारची दखल न घेतल्यास आपणही त्यामध्ये सहभागी आहात.

असे मत आम्ही तयार करून संपुर्ण व्यवस्थेविरूद्ध तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्यात येईल , त्यामुळे निमार्ण होणा-या परिस्थीतीस आपण सर्वस्वी जबाबदार रहाल याची स्पष्ट नोंद घ्यावी. सदर निवेदनाची प्रत मा.मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य मुंबई , मा.शिक्षणमंत्री, मा.जिल्ह्यधिकारी – रायगड यांना देण्यात आले आहे. सदर निवेदन देताना सम्यक राज्य उपाध्यक्ष ऍड . कैलास मोरे, वंचित बहुजन आघाडी जिल्ह्या उपाध्यक्ष हरिश्चंद्र यादव, जिल्हा संघटक सुनिल गायकवाड, जिल्हा प्रसिद्धी प्रमुख अनिल गवळे, तालुका अध्यक्ष धर्मेंद्र मोरे, शहर अध्यक्ष लोकेश यादव, अशोक कदम आदी उपस्थित होते.