Tuesday, September 26, 2023
Homeक्राईमपतीचा खून करून, हल्लेखोरांनी मारल्याचा बनाव करणाऱ्या पत्नीस तळेगाव पोलिसांनी केली अटक..

पतीचा खून करून, हल्लेखोरांनी मारल्याचा बनाव करणाऱ्या पत्नीस तळेगाव पोलिसांनी केली अटक..

तळेगाव (प्रतिनिधी): मावळ परिसरात गहुंजे येथे घडलेल्या जावयाच्या हत्याप्रकरणामध्ये मोठा ट्विस्ट समोर आला आहे. पतीची हत्या हल्लेखोरांनी केली नसून स्वतः पत्नीनेच पतीचा गळा चिरून खून केल्याचे समोर आले आहे. खून केल्यानंतर पत्नीनेच पतीच्या हत्येचा बनाव रचल्याचं पोलीस तपासात समोर आले आहे. पोलिसांनी पत्नीची उलट तपासणी केल्यानंतर हा सर्व प्रकार समोर आला.
अंकिता सुरज काळभोर असे पतीचा खून केलेल्या पत्नीचे नाव असून सूरज काळभोर असे खून झालेल्या पतीचे नाव आहे. पती अंकिताचा शारीरिक आणि मानसिक छळ करायचा.अंकिताला या सगळ्या गोष्टींचा प्रचंड राग येत होता. त्या रागातूनच तिने पतीचा काटा काढला.
याबाबत पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, अंकिता हिचा पती तिचा शारीरिक आणि मानसिक छळ करायचा. शनिवारी रात्री ही सुरज काळभोरने पत्नी अंकिता काळभोरचा शारीरिक छळ केला. मग ती चांगलीच संतापली, या त्रासाला कंटाळून तीने पतीला संपवायचं ठरवलं. यासाठी रविवारी सकाळी अंकिताने पतीला माहेरी म्हणजे गहुंजेला न्ह्यायचं ठरवलं. तत्पूर्वी घरातील चाकू तिने सोबत घेतला.

आकुर्डीतील सुरजच्या घरातून ते सकाळी निघाले. तिथून दोघांनी प्रति शिर्डीत साई बाबांचं दर्शनही घेतलं. मग दुपारी गहुंजेतील घरी जायच्या आधी तेथीलचं शेतात पोहचले. तिथं पोहचल्यावर अंकिताने लघुशंकेला जायचा बहाणा केला. थोडं नजरेआड जाऊन तिने पतीवर नजर ठेवली. पती बेसावध असल्याची खात्री केली अन सोबत आणलेला चाकू बाहेर काढला. दबक्या पावलाने पती जवळ जाऊन तिने मागून चाकूने गळा चिरला आणि जमिनीवर ढकलून दिले. त्यानंतर शेतातील टिकाव आणि दगड डोक्यात घातला. यात पतीचा मृत्यू झाला. अशी माहिती अंकिताकडे केलेल्या चौकशीत समोर आलेली आहे.
आधी अंकिताने ही हत्या चार ते पाच अज्ञातांनी केल्याचा बनाव रचला होता. मात्र तिने सांगितलेल्या घटनाक्रमावर पोलिसांना संशय आला आणि उलट तपासणी करताच पत्नीचे बिंग फुटले. तळेगाव पोलिसांनी पत्नीला अटक केली असून अवघ्या काही तासात खुनाचा उलगडा केला आहे.
- Advertisment -