पाथरगाव येथील अवैध गावठी दारू भट्टीवर कामशेत पोलिसांची कारवाई…

0
56

कामशेत : पाथरगाव येथील गावठी दारू भट्टीवर गुरुवारी दि.28 रोजी कामशेत पोलिसांनी कारवाई करत सुमारे 3 लाख 75 हजार रुपयांचे रसायन नष्ट करत , या संदर्भात 5 जणांवर गुन्हा दाखल केला आहे.पोलिसांनी दिलेल्या माहतीनुसार , पाथरगावच्या हद्दीतील इंद्रायणी नदीकाठी अवैधरीत्या गावठी दारूची भट्टी सुरू करून गावठी दारूची निर्मिती व विक्री केली जात असल्याची गोपनीय माहिती कामशेत पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय जगताप यांना मिळाली होती.

त्या माहितीच्या आधारे गुरुवारी दि.28 रोजी पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण , सहाय्यक फौजदार अब्दुल शेख , पोलीस हवालदार समीर शेख , दत्तात्रय शिंदे , सागर बनसोडे , होमगार्ड घारे यांच्या पथकाने पाथरगाव गावच्या हद्दीतील इंद्रायणी नदीकाठी छापा टाकला असता तिथे विजय केसरीया राठोड , देविदास रमेश नानावत , रामदास मैनावत , सावन योगेश राठोड , रमेश भदीया नानावत ( सर्व रा . पाथरगाव ता . मावळ ) हे इंद्रायणी नदीच्या पात्राच्या जवळ असणाऱ्या मोकळ्या जागेमध्ये लोखंडी व फायबरच्या बेरेलमध्ये अवैधपणे गावठी दारूसाठी लागणारे रसायन तयार करताना दिसुन आले.त्यांना पोलीस पथकाची चाहुल लागताच ते सदरच्या परीसरात वाढलेल्या गवताचा फायदा घेवुन पसार झाले आहेत.

या ठिकाणची पोलिसांनी पाहणी केली असता ,घटनास्थळावर प्रत्येकी दिड हजार लिटरच्या एकुण 5 बॅरेलमध्ये सुमारे 7 हजार 500 लिटरचे असे एकुण 3 लाख 75 हजार रुपयांचे गावठीदारू तयार करण्यासाठीचे रसायन मिळुन आले असुन सदरचे रसायन व ते बनविण्यासाठी लागणारा कच्चा मुद्देमाल पंचांसमक्ष घटनास्थळीच नष्ट केला आहे . तसेच येथील पसार झालेल्या गावठी दारू भट्टी चालकांवर कामशेत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.या गुन्ह्यातील पुढील तपास पोलीस उपनरीक्षक शुभम चव्हाण हे करत आहे.