बुद्ध पौर्णिमे निमित्त तळेगावात बुद्ध भिम गीतांची सुमधुर पहाट…

0
33

तळेगाव दाभाडे : बुद्ध पोर्णिमेनिमित्त विश्वरत्न डॉ . बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती व अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद तळेगाव दाभाडे यांच्या संयुक्त विद्यमाने धम्मपहाट या भीम बुध्द गीतांच्या प्रबोधनात्मक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते .कार्यक्रमाची सुरुवात पहाटे तथागतांच्या पूजनाने झाली . डॉ . बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्यास ॲड. रंजनाताई भोसले यांनी , तर माता रमाईच्या पुतळ्यास मधुसुदन ओझा यांनी पुष्पहार अर्पण केले .

बौध्दाचार्य वसंत इंगळे यांच्या नेतृत्वाखाली धम्म वंदना घेण्यात आली.डॉ .बाबासाहेब आंबेडकर यांच्या निवासस्थानी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. सदर मधूमीत निर्मित रजनीगंधा कार्यक्रमात गायक मधुसुदन ओझा , स्वप्नील पवार , शीतल धूत यांनी एकाहून एक सरस भीम बुद्ध गीते गात बुद्ध पौर्णिमेची पहाट बुद्धमय केली.


यामध्ये वंदन गीत , विश्व तारण्या माहामानव बुद्ध आले जन्मास , पिंपळाच्या पानावर पाहिले चित्र गौतमाचे , रक्तपात हा नको मानवा / वाणी ऐकावी बुद्धाची , चांदण्याची छाया ,भीमसूर्य क्रांतीचा , मनगटात शिवाजी डोक्यात भीम हवा ,रमाई माझी होती वाघीण , संविधानात जिवंत घटनेचा शिल्पकार ,खातो तो घास घेतो तो श्वास बाबासाहेबांमुळे यासारख्या एकाहून एक सरस भीम आणि बुद्ध गीतांनी अगदी पहाटे रसिक तृप्त झाले . या सर्वच गीतांना रसिकांनी उत्स्फूर्त दाद दिली.


यावेळी अखिल भारतीय नाट्य परिषदेचे अध्यक्ष सुरेश धोत्रे , स्मारक समितीच्या अध्यक्षा ॲड. रंजनाताई भोसले , विलास काळोखे , शैलजा काळोखे , मयूर भरड , डॉ . मिलिंद निकम , संग्राम जगताप , हरिश्चंद्र गडसिंग आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी बोलताना सुरेश धोत्रे म्हणाले , दरवर्षी बौध्द पोर्णिमेच्या धम्मपहाट कार्यक्रमाचे नियोजन करण्यात नाट्य परिषदेचा सहभाग राहील. यावर्षीच्या कार्यक्रमासाठी नाट्य परिषदेचे उपाध्यक्ष तथा तळेगाव दाभाडे नगर परिषद शिक्षण मंडळाचे माजी सभापती ब्रिजेंद्र किल्लावाला आणि नाट्य परिषदेचे कार्यकारिणी सदस्य , उद्योजक विलास काळोखे यांनी सढळ हस्ते मदत केली आहे.

धम्मपहाट या भीम बुध्द गीतांच्या सुमधुर गायनाने आणि प्रबोधनात्मक गीतांनी मी भारावून गेलो आहे . कार्यक्रमाचे सुत्रसंचालन एल . डी . कांबळे यांनी केले तर आभार ॲड . रंजनाताई भोसले यांनी मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी स्मारक समितीचे सचिव किसनराव थूल , संचालक तुकाराम मोरे , देवानंद बनसोडे , संजयजी गायकवाड , भागवतजी बिहाडे , गंगाधर सोनवणे , रूपेश घोडेस्वार , आशिष क्षीरसागर व इतर सदस्यांनी योगदान दिले . कार्यक्रमाच्या शेवटी रोहिणी ओव्हाळ यांच्या वतीने खीर वाटप करण्यात आली.