Tuesday, May 30, 2023
Homeपुणेलोणावळाबौद्धिकदृष्ट्या विकलांग मुलामुलींमधील कार्यकुशलतेवर लक्ष केंद्रित करण्याची गरज..

बौद्धिकदृष्ट्या विकलांग मुलामुलींमधील कार्यकुशलतेवर लक्ष केंद्रित करण्याची गरज..

बौद्धिकदृष्ट्या विकलांग मुलामुलींमधील कार्यकुशलतेवर लक्ष केंद्रित करण्याची गरज,अनाम प्रेम परिवारातर्फे आयोजित राष्ट्रीय परिसंवादात तज्ज्ञांचा निष्कर्ष..

लोणावळा (प्रतिनिधी): बौद्धिकदृष्ट्या विकलांग समजल्या जाणा-या मुलामुलींमध्ये अनेक बाबतीत सामान्यांच्या तुलनेत सरस कौशल्यगुण आहेत. त्यांच्यातील कुशलतेला वाव मिळवून दिल्यास व्यावहारिक जगात त्यांचे जगणे सुकर होईल,असे मत लोणावळा येथे झालेल्या तीन दिवसीय दहाव्या राष्ट्रीय बौध्दिक विकलांग परिषदेत तज्ज्ञांनी व्यक्त केले. एकाग्रता, उत्सुकता आणि निरागसता अशा मुलामुलींमध्ये सामान्यांपेक्षा जास्त असल्याने त्यांच्यातील कार्यकुशलतेवर लक्ष केंद्रित करण्याची गरज असल्याचा निष्कर्ष यावेळी व्यक्त करण्यात आला.
अनाम-प्रेम परिवार आणि सुमती ग्राम ह्यूमन राईटस् प्रोटेक्शन फोरमतर्फे 24 ते 26 फेब्रुवारी 2023 दरम्यान लोणावळा येथे आयोजित ‘साद-प्रतिसाद’ 2023 या बालमेळाव्यात सहा राज्यातील बौद्धिकदृष्ट्या विकलांगांसाठी असलेल्या विशेष शाळांमधील दीडशेहून अधिक मुलामुलींनी सहभाग घेतला. (छत्तीसगड, महाराष्ट्र, गोवा, गुजरात, कर्नाटक,आंध्र प्रदेश)आदी ठिकाणच्या मुलामुलींनी सहभाग नोंदविला.
लोणावळ्याजवळील टाटा पॉवर बॉटनिकल गार्डनला या मुलांनी भेट दिली. तेथील निसर्गाचा आनंद घेताना विविध वनस्पतींबाबत त्यांनी कमालीची उत्सुकता दाखविली. दुस-या दिवशी स्मरणशक्ती स्पर्धा, दुकानदारी व्यवहार स्पर्धा, निरीक्षण अनुभव कथन स्पर्धा घेण्यात आल्या. आयत्या वेळेस विषय देवून त्यांच्यातील कलागुणांची केलेली पारख समाधानकारक असल्याचे मुख्य संयोजक तन्वी ठाकूर यांनी सांगितले. ‘कलाविष्कार’ कार्यक्रमात बालकलाकारांनी नृत्य, संगीत, नाटिकांच्या केलेल्या सादरीकरणाने प्रेक्षकांना स्तंभीत/अचंबित केले. विजेत्यांना अनाम प्रेम परिवाराचे सतीश नगरे, हेलन केलर, संस्थेचे सीईओ योगेश देसाई, शिक्षण संचालक अनुराधा बागची आणि उपप्राचार्य प्रिया गोन्सालवीस, अनाम प्रेम परिवाराचे,चित्रपट निर्माता दिग्दर्शक नितीन पानसे, लोणावळा ग्रामीणचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांच्या हस्ते पारितोषिके प्रदान करण्यात आली.
गीतसंगीतातून मतिमंदत्वावरील उपचार आशादायक समारोप समारंभात आंतरराष्ट्रीय ख्यातीचे बासरी वादक पंडित केशवजी गिंडे आणि सतार वादक विदुषी जयाताई जोग यांनी सादर केलेल्या 90 मिनिटांच्या सांगितीक मैफलीत विकलांग मुलेमुली मंत्रमुग्ध झाली. दरम्यान, सौरभ नगरे यांनी रूद्रवीणा वादन केले. अनाम-प्रेम संस्थेतर्फे अशा मुलामुलींवर गीतसंगीतातून मतिमंदत्वावर उपचार करण्याचे प्रयोग आशादायक ठरत असल्याचे अनाम प्रेम परिवाराचे तसेच सुमती ग्राम ह्युमन राईट्स प्रोटेक्शन फोरमचे आशुतोष ठाकूर यांनी यावेळी सांगितले.
या कार्यक्रमास लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ,ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते माजी उपनगराध्यक्ष धीरूभाई कल्याणजी,सामाजिक कार्यकर्ते,उद्योगपती नंदकुमार वाळंज,वरसोलीचे सरपंच संजय खांडेभरड,चैतन्य जेली स्विटस चे नितिन वाडेकर,अॅड. संजय पाटील, वरसोलीचे सरपंच संजय खांडेभरड,राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक विद्यार्थी, लोणावळा पत्रकार संघाचे अध्यक्ष विशाल विकारी, लोणावळा ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष पांडुरंग तिखे, तबला वादक मनोज कदम आदिंचा सत्कार हिमा नगरे, अंजली ठाकूर आदि पदाधिका-यांच्या हस्ते करण्यात आला.
या कार्यक्रमास अनाम प्रेम परिवाराचे लोणावळा येथील संतोष पाळेकर, सारिका पाळेकर,अरुण माळी, तळेगाव दाभाडे येथील नितिन पानसे तसेच मुंबई येथील अंजली ठाकुर, शीतल सावंत, नूतन देशपांडे, सतीश नगरे, हीमा नगरे, अनुप सामंत व इतर अनाम प्रेम परिवारातील सदस्यांचे व मातीकाम कौशल्य विकास चे किरण त्रिलोकी जी यांचे सहकार्य लाभले.

You cannot copy content of this page