लोणावळा (प्रतिनिधी): भांगरवाडी रेल्वे गेट मधील रस्ता दुरुस्तीकरण करावा यासाठी नागरिकांकडून रेल्वे प्रशासनाला विनंती केली जात होती. यावर नागरिकांच्या समस्या लक्षात घेऊन लोणावळा रेल्वे स्टेशन व्यवस्थापक बी एस राजपूत यांनी दोन दिवस गेट बंद ठेवून येथील रस्ता दुरुस्तीचे काम पूर्ण केल्याने नागरिकांकडून समाधान व्यक्त करण्यात येत आहे.
लोणावळा भांगरवाडी रेल्वे गेट क्रॉस करताना खड्डे असल्यामुळे रेल्वे रुळ ओलांडून जाताना खूप त्रास सहन करावा लागत होता. तसेच याठिकाणी क्रॉसिंग करताना अनेक जेष्ठ व महिला अनेकदा दुचाकी घेऊन पडल्याच्या घटना घडल्या आहेत.याबाबत नागरिकांकडून रेल्वे प्रशासनाला माहिती देताच लोणावळा रेल्वे स्टेशन व्यवस्थापक बी एस राजपूत यांनी दखल घेत त्यांनी ताबडतोब मुख्य कार्य निरीक्षक तथा सहाय्यक इंजिनिअर उत्तर लोणावळा यांना 10 ते 12 दिवसांत सदर चे काम पूर्ण करण्याच्या सूचना दिल्या त्या अनुषंगाने दि.27 मार्च ते 29 मार्च दरम्यान रेल्वे प्रशासनाने दोन दिवस रेल्वे गेट बंद ठेवून हे काम पूर्ण केले.
यामुळे नारिकांना प्रवासासाठी थोडा त्रास झाला परंतु येथील खडतर रस्त्यामुळे रेल्वे ओलांडताना होणारा त्रास कायम स्वरूपी निघून गेला असल्यामुळे नागरिकांकडून समाधान व्यक्त केले जात आहे. तसेच रेल्वे प्रशासनाचे आभार व्यक्त केले जात आहे.
यासाठी लोणावळा रेल्वे स्टेशन व्यवस्थापक बी एस राजपूत, टी आई घाटचे डी के सिंह, जे ई वरकर्स गोविंद सिंह व आर पी एफ आदींनी मोलाचे सहकार्य केले.