Friday, December 8, 2023
Homeमहाराष्ट्ररायगडभिसेगाव डी. पी.रस्त्याची आता गिनीज बुकात नोंद !

भिसेगाव डी. पी.रस्त्याची आता गिनीज बुकात नोंद !

भूमिपूजन होऊन व कार्यादेश देऊन झाली पाच वर्षे , तरी रस्त्याचा पत्ताच नाही…

भिसेगाव- कर्जत ( सुभाष सोनावणे ) सध्या कर्जत नगर परिषदेचा ” कंट्रोल हिन ” कारभार चालू आहे . प्रशासन काही काम करीत नाही , आणि त्यावर अंकुश ठेवणारे सत्ताधारी त्याकडे लक्ष देत नाहीत , त्यामुळे नागरिकांची अवस्था ” सहन हि होत नाही , आणि सांगता हि येत नाही ” अशी झाली आहे . कागदोपत्री रस्त्यांची कामे एकहाती काढून ठेकेदाराकडून ” मलिदा रुपी चॉकलेट ” घ्यायचे व भविष्यात या ठेकेदाराने कामे केली नाहीत , तर त्याला फटकारणे राहिले दूर च , त्याला कडेवर घेऊन नाचायचे , असे चित्र सध्या कर्जत न.प.मध्ये पाहण्यास मिळत आहे . जुलै २०१८ रोजी भिसेगाव डी.पी. रस्ता कार्यादेश व भूमिपूजन होऊन तब्बल पाच वर्षे झाली तरी अद्यापी रस्त्याचा पत्ताच नसल्याने , या रस्त्याची आता ” गिनीज बुकात ” नोंद झाल्याची संतापजनक प्रतिक्रिया येथील नागरिक करीत आहेत.

कर्जत नगर परिषदेने सन २०१४ – १५ च्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सत्ताधारी असताना कर्जत शहरातील रस्त्यांची कामे काढली होती , हि सर्व सरसकट कामे मे. लोणावळा कन्स्ट्रक्शन , लोणावळा या ठेकेदाराला मिळाली होती . विशेष म्हणजे पालिकेची सर्व प्रभागातील कामे हि एकाच ठेकेदाराला कशी मिळतात ? हा शोध मोहिमेचाच भाग ठरेल . सदरच्या रस्त्याचे कार्यादेश जुलै २०१८ साली दिलेले आहेत , तर त्याचे भूमिपूजन तत्कालीन नगराध्यक्षा सौ. रजनीताई रामदास गायकवाड यांनी केले होते .मात्र आता शिवसेना – भाजपा – आरपीआय यांची सत्ता येऊन शेवटचा एक वर्षे राहिला तरी ठेकेदाराने अद्यापी काम सुरू केले नसून गटार बांधण्यासाठी खड्डे खणून ठेवले असल्याने गटाराचे दुर्गंधीयुक्त पाणी रस्त्यावर येत असून जुना रस्ता देखील संपूर्ण उखडला असून त्यातून लोखंडी शिगा बाहेर आल्या आहेत , त्यामुळे रात्री अपरात्री या शिगा पायाला लागल्यास दुखापत होण्याची शक्यता आहे.

रस्ता व गटारे होत नसल्याने या परिसरात पावसाळ्यात पूर आल्याची परिस्थिती असून येथील नागरिकांच्या घरात पाणी शिरून दरवर्षी अतोनात नुकसान होत आहे . येथील रहिवासी वेळोवेळी तोंडी व पत्रव्यवहार करून तक्रारी करत असूनही पालिका प्रशासन व सत्ताधारी याकडे दुर्लक्ष करत असल्याने नागरिकांत पालिके विरोधात संताप खदखदत आहे . याविरोधात त्वरित पाऊले उचलून ठेकेदारास रस्ता बनविण्यास सांगून अशा बेजबाबदार ठेकेदाराला काळ्या यादीत टाकून त्याच्यावर दंडात्मक कारवाई करून त्याचे शिल्लक असलेली अनामत रक्कम देऊ नये , अशी मागणी येथील भिसेगाव रहिवासी वर्ग करत आहेत.
- Advertisment -

You cannot copy content of this page