मळीची अवैध वाहतूक करणाऱ्या आरोपीस भरारी पथकाने वरसोली टोल नाका येथून केले अटक..

0
513

मावळ : परदेशात निर्यात करण्याच्या उद्देशाने घेतलेली मळी इतरत्र अवैध ठिकाणी विक्री करण्याच्या तयारीत असलेल्या आरोपीला राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र.1ने शनिवार दि.26 रोजी वरसोली टोलनाका येथून अटक केली आहे. यावेळी कारवाईत आरोपीच्या ताब्यातील एक भारत बेंझ कंपनीचा 14 टायरी टँकर व 25 टन मळीसाठा असा एकूण 23 लाख 75 हजाराचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

या प्रकरणी अजमेरसिंग रामकिशनसिंग ( हरीयाना राज्य ) यास अटक करुन त्याच्या विरोधात महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 चे कलम 65 ( अ ) ( ई ) 70, 80( 1 ) , 83 व 90 , 108 नुसार गुन्हा दाखल करून शनिवार दि. 26 रोजी वडगाव मावळ न्यायालयात हजर केले असता आरोपीला मंगळवार दि.28 पर्यंत पोलीस कोठडी देण्यात आली आहे .

राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र.1 चे निरीक्षक एस . एल . पाटील यांनी दिलेल्या माहितीनुसार , भरारी पथकाला शुक्रवार दि.25 रोजी मध्यरात्री परदेशात निर्यात करण्याच्या नावाखाली घेतलेली मळी इतरत्र अवैध ठिकाणी विक्री करण्याच्या उद्देशाने पुणे – मुंबई या महामार्गावरील वरसोली टोलनाक्यावरुन अवैध मळीची वाहतूक होणार असल्याची गुप्त माहिती मिळाली . त्यानुसार सापळा रचून शनिवार दि.26 रोजी सकाळी 3:25 वाजण्याच्या सुमारास आरोपीकडून एक भारत बेंझ कंपनीचा 21 लाख 50 हजार रुपये किंमतीचा 14 टायर टँकर व 2 लाख 25 हजार रुपये किंमतीची 25 टन मळी असा एकूण रुपये 23 लाख 75 हजाराचा मुद्देमाल वरसोली टोलनाका येथून ताब्यात घेण्यात आला आहे.

सदर कारवाई राज्य उत्पादन शुल्कचे आयुक्त कांतीलाल उमाप , दक्षता व अंमलबजावणी संचालक उषा वर्मा , पुणे विभागीय आयुक्त प्रसाद सुर्वे , पुणे विभागीय अधीक्षक संतोष झगडे यांच्या मार्गदर्शनाखाली , राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्र.1चे निरीक्षक एस . एल . पाटील , बी . विभाग निरीक्षक विठठल बोबडे , तळेगाव दाभाडे निरीक्षक संजय सराफ , दुय्यम निरीक्षक बी . एस . घुगे , एम . आर . राठोड , दिपक सुपे , स्वाती भरणे , व कार्यालयीन स्टाफ , चंद्रकांत नाईक , सुरज घुले , गणेश वावळे , अंकुश कांबळे , मुंकूंद पोटे , जयराम काचरा व राहूल जौंजाळ यांच्या पथकाने केली असून पुढील तपास एस . एल . पाटील हे करत आहेत.