महाराष्ट्रात धुराळा उडणार ,बैलगाडा शर्यतीला सुप्रीम कोर्टाची सशर्त परवानगी…

0
122

 मुंबई, दि.16 – गेल्या अनेक वर्षापासून महाराष्ट्रभर चर्चेत असणाऱ्या बैलगाडा शर्यतीवरील बंदी हटविल्याचा निर्णय गुरुवारी सुप्रीम कोर्टात दिला.

सुप्रीम कोर्टाच्या या सुनावणीकडे संपूर्ण महाराष्ट्रातील बैलगाडा प्रेमींचे लक्ष लागून राहिले होते.त्यानंतर आता सुप्रीम कोर्टाने महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी दिली असल्यामुळे सर्व बैलगाडा प्रेमी आनंदोत्सव साजरा करत आहेत.

यापूर्वी मुंबई हायकोर्टाने शर्यतीवर बंदी कायम ठेवली होती. मात्र आता सुप्रीम कोर्टाच्या निर्णयानंतर बैलगाडा मालकांना मोठा दिलासा मिळाला आहे.“सुप्रीम कोर्टाचे मी आभार मानतो. बैलगाडा प्रेमींसाठी ही आनंदाची बातमी आहे. महाविकास आघाडीने जोर लावण्याने हा निर्णय आला आहे.

दिलीप वळसे पाटील, सुनील केदार, बंटी पाटील या सर्वांना मी धन्यवाद देतो. सर्व बैलगाडा मालकांचे अभिनंदन करतो. हा ग्रामीण भागातील लोकांच्या जिव्हाळ्याचा प्रश्न होता. तसेच महाराष्ट्र सरकारने जी नियमावली तयार केली आहे त्यानुसार यापुढे बैलगाडा शर्यतीचे आयोजन करण्यात येणार आहे,” अशी प्रतिक्रिया शिरुरचे खासदार अमोल कोल्हे यांनी दिली आहे.

याआधी राज्यात बैलगाडा शर्यत सुरू करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आलेली आहे. महाराष्ट्राने बैलगाडा शर्यत सुरू करण्याच्या संदर्भात २०१७ मध्ये एक कायदा संमत केला होता. मात्र, त्याला मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल झाल्यानंतर स्थगिती दिली होती. त्यानंतर राज्य सरकारने या आदेशाला अनुसरून सर्वोच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.त्या याचिकेवर सुनावणी करत सुप्रीम कोर्टाने बैलगाडा शर्यतिला सशर्त परवानगी दिली असल्याने आता महाराष्ट्रात धुराळा उडणार.