Saturday, November 23, 2024
Homeपुणेमावळमावळातील दोन ऑर्केस्ट्रा बारवर वेळेचे बंधन न पाळल्याबद्दल कारवाई..

मावळातील दोन ऑर्केस्ट्रा बारवर वेळेचे बंधन न पाळल्याबद्दल कारवाई..

मावळ : ( श्रावणी कामत) लोणावळा उपविभागाचे सहायक पोलीस अधीक्षक श्री सत्यसाई कार्तिक यांनी उपविभागाचा पदभार स्वीकारल्यानंतर अवैध धंद्यांवर आणि गुन्हेगारांवर कारवाईची मालिका सुरू ठेवली आहे. पुणे ग्रामीण जिल्ह्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स, आणि बार्ससाठी प्रशासनाने वेळेचे बंधन घालून दिले असतानाही काही आस्थापना चालक त्याकडे दुर्लक्ष करत असल्याची माहिती कार्तिक यांना प्राप्त झाली होती.
सदर माहितीच्या आधारे, दिनांक १० ऑगस्ट २०२४ रोजी मध्यरात्री कार्तिक यांनी त्यांचे पथकासह कामशेत येथील दीपा बार अँड रेस्टॉरंट आणि वडगाव मावळ येथील फ्लेवर्स बार अँड रेस्टॉरंट येथे छापे टाकले. या कारवाईत वरील दोन्ही बारमालक प्रशासनाने घालून दिलेल्या वेळेच्या मर्यादेचे उल्लंघन करत असल्याचे आढळले. त्यांनी विहित वेळेपेक्षा अधिक कालावधीसाठी ग्राहकांना खाद्यपदार्थ आणि दारूची विक्री केली होती. यामुळे या बारमालकांवर महाराष्ट्र पोलीस अधिनियमाच्या कलम ३३(डब्ल्यू) आणि १३१ अन्वये कायदेशीर कारवाई करण्यात आली आहे.
पुढील तपास अनुक्रमे कामशेत आणि वडगाव मावळ पोलीस ठाण्यांकडून सुरू आहे. अशा प्रकारे नियमांचे उल्लंघन करणाऱ्या आस्थापनांवर कठोर कारवाई केली जाणार असल्याचे सत्यसाई कार्तिक यांनी स्पष्ट केले आहे. आस्थापना चालकांनी प्रशासनाने घालून दिलेल्या नियमांचे आणि वेळेच्या बंधनाचे काटेकोरपणे पालन करावे, असेही त्यांनी आवाहन केले आहे.
ही कारवाई पुणे ग्रामीण पोलीस दलाचे पोलीस अधीक्षक पंकज देशमुख, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे आणि सहायक पोलीस अधीक्षक सत्यसाई कार्तिक यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली.
- Advertisment -

You cannot copy content of this page