मावळात कोंबड्या वाहतूक करणाऱ्या टेम्पोची जबरी चोरी, पोलिसांनी टेम्पो केला हस्तगत..

0
264

कामशेत : कामशेत पोलीस स्टेशन हद्दीतील जुना मुंबई पुणे महमार्गावरील अहिरवडे फाट्यावर कोंबड्या वाहू टेम्पो चोरी गेल्याची घटना बुधवार दि.30 रोजी मध्यरात्री 12:30 च्या सुमारास घडली आहे.

या संदर्भात टेम्पो चालक जमाल अहमद अताउल्ला खान ( वय 35 ) यांनी कामशेत पोलीस स्टेशन मध्ये फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहिती नुसार टेम्पो चालक खान व सहचालक हे टेम्पो क्र. MH 43 BP 5204 यामधून पोल्ट्री फार्मचा जिवंत कोंबड्यांची वाहतूक करत असताना जुन्या मुंबई पुणे महामार्गावर अहिरवडे फाट्यावर आल्यास एका पांढऱ्या रंगाच्या बुलेट वर आलेल्या चार अनोळखी इसमांनी टेम्पो रस्त्यात अडवून टेम्पोत जबरदस्तीने घुसून क्लीनर व चालक यांना कोयत्याचा धाक दाखवून व हाताने मारहाण करून त्यांच्या ताब्यातील टेम्पो व त्यातील माल असा एकूण 12 लाख 30 हजाराचा मुद्देमाल जबरदस्तीने चोरी करून पुण्याच्या दिशेने पसार झाले आहेत.

अशी फिर्याद टेम्पो चालकाने देताच तपासाच्या अनुषंगाने तपास करत असताना कामशेत पोलीस पथकास दि.31 रोजी गोपनीय माहिती मिळाली की सदरचा टेम्पो हा मोशी कचरा डेपोकडे जाणाऱ्या रोडवर,पुणे नाशिक महामार्गाजवळ, ता. हवेली, जि. पुणे उभा असल्याची खात्रीशीर माहिती मिळाली. त्यावरून कामशेत पोलीस पथकाने तात्काळ सदर ठिकाणी जावून पाहणी केली असता गुन्ह्यातील चोरी गेलेला टेम्पो क्र. MH 43 BP 5204 हा मोशी येथून हस्तगत करून ताब्यात घेतला असून गुन्ह्यातील फरार आरोपी कोंबडी चोरांचा शोध कामशेत पोलीस घेत आहेत.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली कामशेत पोलीस निरीक्षक संजय जगताप, पोलीस उपनिरीक्षक शुभम चव्हाण, सहाय्यक फौजदार, अब्दुल शेख, पोलीस हवालदार गणेश तावरे, पोलीस नाईक गवारी, दत्ता शिंदे यांचे पथक गुन्ह्यातील पुढील तपास करत आहेत.