लोणावळा (लोणावळा): शहरातील पुणे मुंबई महामार्गालगत एका गॅरेज मध्ये करण्यात आलेले अतिक्रमण न काढल्याची तक्रार भाजपचे कार्यकर्ते सुनील तावरे यांनी नगर परिषदेकडे केली आहे. सदर अतिक्रमणे न काढल्यास उपोषण करण्यात येईल , असा इशारादेखील त्यांनी दिला आहे .
लोणावळा नगरपरिषदेला दिलेल्या निवेदनातून तावरे म्हणाले , पुणे – मुंबई महामार्गालगत अपोलो मोटर्स रिपेअरींग वर्क्स तर्फे बाळकृष्ण राघु राणे यांच्या मिळकतीमधील विना परवाना बांधकामाबाबत तक्रार करण्यात आली होती . लोणावळा नगरपरिषदेच्या वतीने संबंधित मिळकतधारकास महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम 1966 चे कलम 53( 1 ) अन्वये नोटीस बजावण्यात आली आहे . मात्र अद्यापही नगरपरिषदेच्या वतीने कारवाई झालेली नाही . मात्र , असे असूनही सदर बांधकामासंदर्भात कारवाई पूर्ण केली असल्याची माहिती उच्च न्यायालय गठित तज्ज्ञ समितीला नगरपरिषदेच्या वतीने देण्यात येत समितीचीही दिशाभूल करण्यात आली असल्याचे तावरे म्हणाले . कारवाई झाल्याच्या निषेधार्थ अखेर आपण उपोषणाचा इशारा दिला आहे , असे तावरे म्हणाले .
त्यावर संपूर्ण संबंधित बांधकामाचे मालकी हक्काचे, बांधकाम मंजुरीचे व याबाबतचे संपूर्ण कागदपत्रे नगरपरिषदेमधील अतिक्रमण विभागाकडे सादर करावी , असे कळविण्यात आलेले आहे . नोटिशीच्या अनुषंगाने कारवाई करण्यात येणार असून सध्या नियोजित असलेले उपोषण रद्द करावे , असे मुख्याधिकारी पंडित पाटील यांनी सांगितले.