यावर्षी होणार श्री धापया महाराज देवस्थान अक्षय्य तृतीया उत्सव !

0
108

कुस्त्यांच्या फडातही उडणार धुरळा ,भाविकांत आनंदाचे वातावरण..

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे )कर्जतचे ग्रामदैवत श्री धापया महाराज देवस्थान उत्सव अक्षय तृतीयाच्या शुभ दिनी दरवर्षी होत असतो तर दुसऱ्या दिवशी महाराष्ट्राच्या कानाकोप-यातुन येणाऱ्या पैलवांनांमुळे कुस्त्यांचा सामना चितपट होताना बघण्यास कुस्ती शौकीन सकाळ पासूनच गर्दी करून रहात असतात.गेल्या दोन वर्षे होणारा हा उत्सव व कुस्त्या कोरोना विषाणू संसर्ग महामारीच्या दुसऱ्या टप्यामुळे रद्द करण्यात आल्या होत्या.

मात्र यावर्षी हा उत्सव दि .३ मे २०२२ रोजी धुमधडाक्यात साजरा होणार असून दुसऱ्या दिवशी ४ मे रोजी कुस्त्यांच्या फडाचा धुरळा देखील उडणार असल्याने धापया देवस्थानचे दर्शन व कुस्ती शौकिनांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.श्री धापया महाराज देवस्थानचा उत्सव दरवर्षी मोठया उत्साहात साजरा केला जातो . दरवर्षी पहाटे पाच वाजताच अक्षय्य तृतीया उत्सवा निमित्त सनईवादन होणार आहे , तर ६ वाजता लघुरुद्र करून श्री धापया महाराज देवस्थानची पूजा अर्चा करण्यात येते.

तर दिवसभर देवस्थान परिसरात दर्शन घेण्यास भाविकांची रांग असते , कुणाचे नवस फेडण्याची रिघ तसेच येथे जत्रेचे स्वरूप असते . मिठाई , खेळणी दुकानवाले दिवसभर बसतात . सायंकाळी ५ वाजता ” श्रीं ” ची पालखी व मिरवणूक , सायंकाळी ६ वाजता प्रसिद्ध बुवांचे चक्री भजन , रात्री १० वाजता मराठी चित्रपट आयोजित केला आहे.तर दुसऱ्या दिवशी ४ मे २०२२ रोजी महाराष्ट्राच्या कानाकोप-यातून तसेच मुंबई , पुणे , सोलापूर , कोल्हापूर , नवी मुंबई , नाशिक , सांगली , सातारा , तसेच कर्जत तालुक्यातील छोटे – मोठे पैलवान  सकाळपासून चालणाऱ्या कुस्तीसाठी हजेरी लावून कुस्ती जिंकून श्री धापया महाराज देवस्थानच्या आखाड्यातील लाल माती उधळून जयघोष करीत सलामी देणार आहेत.

देवस्थान कमिटी अखेरच्या कुस्तीपर्यंत सर्वांना न्याय देत हा उत्सव आजपर्यंत चालू आहे.कुस्तीचा हा वारसा स्वर्गीय रमेश चंदन पाटील , हसन शेख , मामा शेलार , दत्ता देशमुख यांनी चालू केलेला आजही  कुस्ती शौकिनांना पाहण्यास मिळत आहे.तरी भाविकांनी उत्सवास – पालखीस व कुस्त्या पाहण्यासाठी मोठ्या संख्येने धापया मैदान , कर्जत जि . रायगड येथे उपस्थित रहावे , असे आवाहन धापया देवस्थान कमिटीच्या वतीने अध्यक्ष गणेश संजय शिंदे , उपाध्यक्ष – प्रकाश दामोदर आणेकर , खजिनदार – महेंद्र बबन चंदन ( पाटील ) , सहखजिनदार – गौरव चंद्रकांत भानुसघरे , चिटणीस – मनोज चंद्रकांत वरसोलिकर , सहचिटणीस – सचिन एकनाथ दगडे ,यांनी केले आहे.