रसायनी एच.आय.एल कंपनीच्या शेकडो कामगारांना अखेर न्याय !

0
180

भाजप नेते सुनील गोगटे यांच्या प्रयत्नाना यश…

भिसेगाव- कर्जत( सुभाष सोनावणे)प्रयत्न केल्याने चिकाटीच्या जोरावर नक्कीच यश मिळते ,हे भाजपचे नेते व किसान मोर्चा कोकण संपर्क प्रमुख सुनील गोगटे यांनी दाखवून दिले असून गेल्या फेब्रुवारी २०२२ रोजी त्यांनी दिल्ली येथे जाऊन केंद्रीय मंत्री नितीनजी गडकरी यांची भेट घेऊन रसायनी येथील एचआयएल कंपनी बंद करणार असल्याचे कंपनीच्या कामगारांच्या तक्रारीवरून त्यांचा कुटुंब सावरण्याचा व १००० कामगारांना कंपनीचे व्यवस्थापक देशोधडीला लावण्याचे जे धोरण अवलंबणार होते ,हा गहन प्रश्न दिल्ली दरबारी मांडला असता आता या मागणीला यश आले असून कंपनी सुरळीत चालू रहाणार आहे.

रायगड जिल्ह्यातील खोपोली , रसायनी पाताळगंगा येथील कारखाने ,औद्योगिक कंपन्यामुळे एके काळी सोन्याचा धूर याठिकाणी निघत होता , मात्र गेल्या काही वर्षांपासून येथे कारखाने बंद होत गेले व कामगारांवर उपासमारीची पाळी येऊन ठेपली.यावेळी रसायनी येथील एचआयएल हि मोठी कंपनी बंद करण्याचा घाट कंपनी व्यवस्थापक करणार होते.येथील कामगार वर्गाने भारतीय जनता पक्षाचे किसान मोर्चा कोकण संपर्कप्रमुख सुनील गोगटे यांची भेट घेऊन शेकडो कामगार देशोधडीला लावण्याच्या कंपनीच्या कट कारस्थानाविरोधात दंड थोपटून न्याय देऊन त्यांचे कुटुंब सावरा , अशी विनवणी वजा साकडे कामगारांच्या शिष्ठमंडळाने भाजप नेते सुनील गोगटे यांची विठ्ठल नगर – कर्जत येथील त्यांच्या संपर्क कार्यालयात भेट घेऊन केली होती.

एचआयएल कंपनीचे भारतात तीन प्लांट आहेत , त्यातील एक रसायनी येथे आहे . हा प्लांट फायद्यात असून ही ईतर दोन प्लांटमुळे ह्या कंपनीचा देखील गाशा गुंडाळण्याचा घाट कंपनीचे काही वरिष्ठ अधिकारी घालत होते.त्यामुळे सुमारे दोनशे तीस कायम स्वरूपी आणि सहाशे कंत्राटी कामगारांच्या नोकर्‍या जाण्याची शक्यता होती. कंपनीकडे भरपूर ऑर्डर आहेत ,परंतु वरिष्ठ अधिकारी कंपनी नुकसानीत आहे ,ऑर्डर नाहीत असे भासवित होते . कोरोना कालावधीत प्रचंड मोठ्या प्रमाणात ऑर्डर कामगारांनी डबल ड्यूटी करून पुर्‍या करून अनेकांचे जीव वाचविण्याचे काम केले , तेच कामगार आज रस्त्यावर येण्याची वेळ आली होती.

म्हणुनच कामगारांनी संबंधित मंत्रालयात पाठपुरावा करण्यासाठी आम्हाला मदत करा , शेकडो कामगारांचे कुटुंब सावरा , अशी मागणी त्यांनी भाजप नेते सुनील गोगटे यांच्याकडे केली होती.म्हणूनच भाजपचे मा. जिल्हा अध्यक्ष तथा पनवेलचे आमदार प्रशांतदादा ठाकूर , उरणचे आमदार महेशशेठ बालदी यांनी निवेदन दिले तर कर्जतचे भाजप नेते सुनील गोगटे यांनी केंद्रीय परिवहन मंत्री मा.नितीनजी गडकरी साहेब आणि केंद्रीय आरोग्य मंत्री मा.मनसुख मांडवीया यांची भेट घेऊन.

त्यांच्याकडे हि फिर्याद मांडली असता त्यांनी एचआयएल कंपनीच्या थकीत रक्कमेपैकी ९७ कोटींची त्वरित रक्कम देण्याचे सांगून कामगारांना न्याय मिळवून दिला ,व सर्व १००० कामगारांची कुटुंब सावरून त्यांची रोजी – रोटी वाचवली.त्यामुळे कंपनीच्या कामगारांनी मा .मंत्री नितीनजी गडकरी साहेब ,केंद्रीय आरोग्य मंत्री मा . मनसुख मांडवीया , मा. राज्य आरोग्य मंत्री भारती पवार ,कोकण संपर्कप्रमुख सुनील गोगटे , राहुल मसणे ,एल ए ठाकूर – जनरल सेक्रेटरी , हिलरू , आर डी पाटील – जनरल सेक्रेटरी , को.श्र.संघ , ए.एन.मुंढे – जनरल सेक्रेटरी , म.न.का.सेना , सामाजिक कार्यकर्ते व पत्रकार रमाकांत जाधव , यांचे विशेष आभार मानले आहे.मिळालेल्या यशामुळे कर्जतमध्ये भाजप नेते सुनील गोगटे यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.