Saturday, September 21, 2024
Homeमहाराष्ट्ररायगड" राजेंद्र कमळू फुलावरे " यांना राजिप " आदर्श शिक्षक पुरस्कार २०२४-२५...

” राजेंद्र कमळू फुलावरे ” यांना राजिप ” आदर्श शिक्षक पुरस्कार २०२४-२५ ” ने सन्मानित !

भिसेगाव – कर्जत ( सुभाष सोनावणे ) खालापूर तालुक्यातील वडविहीर २ या शाळेत कार्यरत असलेले राजेंद्र फुलावरे सर यांना शिक्षक दिनानिमित्त रायगड जिल्हा परिषदेचा २०२४ चा ” आदर्श शिक्षक पुरस्कार ” जाहीर झालेला आहे . त्यांच्या आजपर्यंत शिक्षण क्षेत्रातील अनमोल व भरीव कार्यामुळेच त्यांना गौरविण्यात आले आहे.

त्यांच्या सेवेची सुरुवात खालापूर तालुक्यामध्ये रायगड जिल्हा परिषद शाळा‌ वडगाव येथे २००६ साली सुरुवात झाली. वडगाव हे अतिशय समृद्ध अशी ग्रामपंचायत असणारे गाव , मात्र जिल्हा परिषदेचा शाळेचा पट मात्र खुप कमी होता , हे लक्षात आल्यानंतर सर्व शिक्षकांनी गावामध्ये पालकांना भेटुन बैठक घेऊन ७० पटावरुन ३०० हुन अधिक शाळेचा पट केला . यासाठी ” गावातील प्रत्येक विद्यार्थी हा जिल्हा परिषदेच्याच शाळेत शिकेल ” असा ठराव ग्रामस्थांनी बैठकीत संमत करुन घेतला . इंग्रजी माध्यमामध्ये शिकत असलेली सर्व मुले पुन्हा जिल्हा परिषदेच्या शाळेत दाखल केली . या विशेष कार्याबद्दल तत्कालीन उप शिक्षणाधिकारी डी. डी. पाटील साहेब यांनी स्वतः शाळेत येऊन शाळेतील शिक्षकांचे स्वागत केले . सर शिकवत असलेल्या चौथीच्या वर्गातील १०० % मुले शिष्यवृत्ती परीक्षेस बसवून ४२ विदयार्थी उत्तीर्ण झाले , अशी किमया फुलावरे सरांनी घडवली . शाळेत भौतिक सुविधा उपलब्ध करुन शाळा अतिशय चांगल्या प्रकारे आदर्श बनवली.आज वडगाव शाळा ही ” मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ” या स्पर्धेमध्ये ” तालुक्यात प्रथम ” आलेली आहे.

सध्या राजेंद्र फुलावरे सर वावर्ले केंद्रातील वडविहीर २ या शाळेवर ” शाळाप्रमुख ” म्हणून कार्यरत आहेत , तर शिक्षक संघटनेचे प्रदेश अध्यक्ष आहेत . शिक्षकांच्या विविध प्रश्नासाठी विविध आंदोलने करून न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करत असतात , तसेच रायगड जिल्हा ” शिक्षक पतपेढी संचालक ” म्हणून निवडून आलेले आहेत. वडविहीर २ हे गाव ” कोयना प्रकल्प पुनर्वसन ” या प्रकल्पाअंतर्गत मोर्बे धरणाच्या काठाला वसलेले आहे. या गावामध्ये ” सांप्रदायिक परंपरा ” असणारी सर्व मंडळी आहेत . ग्रामस्थांच्या मदतीने या शाळेमध्ये CSR फंडाच्या माध्यमातुन जवळ जवळ १० लाखाची कामे केलेली आहेत. त्यामध्ये सोलर पॅनेल , संगणक , प्युरिफायर , पाण्याची टाकी , कपाटे , प्रोजेक्टर , मुलांना वर्षभर पुरेल असे सर्व साहित्य दप्तरं – वह्या – पेन – पेन्सिल – विद्यार्थ्यासांठी लागणा-या सर्व गरजेच्या वस्तु यांचा समावेश आहे . शालेय ” परसबाग ” अतिशय छान प्रकारे तयार केलेली आहे . शाळेभोवताली फळांची व फुलांची झाडे लावली आहेत . भौतिक सुविधेने सज्ज अशी शाळा असल्याने मागील वर्षी ” मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा ” या स्पर्धेमध्ये केंद्रस्तरावर ” प्रथम क्रमांक ” मिळाला होता.

येणा-या काळामध्ये माझी शाळा ही जिल्हास्तरावर व राज्यस्तरावर आणण्यासाठी सरांच्या मार्गदर्शनाखाली शाळेतील दोन्ही शिक्षक , ग्रामस्थ मिळून प्रयत्न करित आहेत . आज जो पुरस्कार मला प्राप्त झाला त्यामध्ये माझे विद्यार्थी – मित्रांचे – गामस्थांचे – कुटुंबियांचे – सहका-यांचे – वडीलधारे जेष्ठ नागरिकांचे फार मोठे योगदान आहे . त्यांना सन्मानित केलेल्या या आदर्श शिक्षक पुरस्कारामुळे त्यांचे सामाजिक – आर्थिक – राजकिय – शैक्षणिक – धार्मिक – सांस्कृतिक क्षेत्रातून अनेक मान्यवरांनी कौतुक व शुभेच्छा दिल्या आहेत . यामुळे मला आणखी काम करण्यासाठी उत्साह मिळत आहे , अशी भावना राजेंद्र फुलावरे सरांनी व्यक्त करून भविष्यात ” राज्याचा आदर्श शिक्षक पुरस्कार ” मिळेल अशा पद्धतीचे कार्य माझ्या हातुन निश्चितपणे होईल , अशी खात्री असल्याचे मत त्यांनी व्यक्त केले.
- Advertisment -

You cannot copy content of this page