
लोणावळा दि.27: महिला व मुलींच्या तक्रार व संरक्षणासाठी पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ.अभिनव देशमुख, यांच्या संकल्पनेतून व अपर पोलीस अधिक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाटील यांच्या मार्गदशनाखाली लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशनहद्दीत “आपली सुरक्षा आमचे ध्येय व कर्तव्य” या ब्रीद वाक्याप्रमाणे प्रतिबंधात्मक जनजागृती करण्यात आली आहे.
अनेक वेळा महिलांवर अत्याचार होत असताना अनेक महिला त्याबाबत तक्रार करण्यास घाबरत असतात त्याच अनुषंगाने महिलांना त्रास देणारे, छेडछाड करणारे, टन्ट मारणारे,मुलींना रस्त्यात आडवून बोलण्याचा प्रयत्न करणारे, धमकवणारे, तसेच वाहनात, रिक्षात अथवा कोणत्याही ठिकाणी छेडछाड होत असेल किंवा संशय असेल तर निर्भयपणे मदतीसाठी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन दूरध्वनी क्रमांक (०२११४)२७३०३६, नियंत्रण कक्ष पुणे ग्रामीण दूरध्वनी क्रमांक (०२०) २५६५७१७१/ २५६५७१७२ या क्रमांकावर संपर्क करण्यासाठी हद्दीत जनजागृती करण्यात आली आहे.
त्यासाठी लोणावळा ग्रामीण पोलीस ठाण्यात निर्भया पथकाची स्थापना करण्यात आलेली आहे. त्याचप्रमाणे सर्वत्र महिला सुरक्षेच्या अनुषंगाने कार्ला, एकविरा, वेहेरगाव, वरसोली टोलनाका, औंढे, सिंहगड कॉलेज, टायगर पॉईंट,लायन्स पॉईंट येथे स्टिकर लावण्यात आले आहेत.तसेच अशा प्रकारच्या घटना घडल्यास, घडत असल्यास किंवा तसा संशय वाटत असल्यास तात्काळ त्याची माहिती लोणावळा ग्रामीण पोलिसांना कळवावी असे आवाहन पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्यावतीने करण्यात आले आहे.
सदर मोहिमेत पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे यांच्या समवेत सहाय्यक पोलीस निरीक्षक निलेश माने, सहाय्यक पोलीस निरीक्षक अनिल लवटे, निर्भया पथकातील महिला पोलीस नाईक पुष्पा घुगे, पोलीस हवालदार विशाल जांभळे, बनसोडे, शकील शेख,अमित ठोसर, जय पवार, पोलीस नाईक जाधव, उकिर्डे व कॉन्स्टेबल सिद्धेश्वर शिंदे, पंचरास, गायकवाड यांच्यासह होमगार्ड व वॉर्डन सहभागी झाले होते.