लोणावळा पोलिसांनी दिल्या बंगले, रिसॉर्ट चे मालक व चालकांना सूचना…

0
1338

लोणावळा दि.8 :लोणावळा उपविभागातील सर्व पोलीस स्टेशन हद्दीतील बंगले, रिसॉर्ट, टेंट मालक,चालक, केअरटेकर यांना मार्गदर्शक सूचना देण्यासाठी दि.७ रोजी लोणावळा ग्रामीण पोलीस स्टेशन प्रांगणात बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.

सदर बैठकीत लोणावळा व मावळ तालुका परिसरात येणारे पर्यटक व त्यांना पुरविण्यात येणाऱ्या विविध सेवा सुविधा तसेच निवास व्यवस्था देताना त्या कायद्याच्या चौकटीत राहून पुरविण्यात याव्यात,वरील आस्थापना चालविताना सर्व संबंधित विभागाच्या कायदेशीर परवानग्या घेण्यात याव्यात, खाजगी बंगले मालक, चालक यांनी बंगल्याकरिता कमर्शिअल परवाने घेण्यात याव्यात, मद्याचा वापर होणार असल्यास राज्य उत्पादन शुल्क विभाग यांचा परवाना घेण्यात यावा , स्पीकर वापरणार असल्यास संबंधित पोलीस स्टेशन कडून परवाना घेऊन विहित वेळेत व मर्यादित आवाजात वापर करावा.

आपल्याकडील आस्थापना मध्ये CCTV यंत्रणा कार्यान्वित करण्यात यावी, येणाऱ्या पर्यटकांमुळे सोसायटीमधील आणि आजूबाजूच्या स्थानिक नागरिकांना त्रास होणार नाही याची दक्षता घ्यावी, येणाऱ्या सर्व पर्यटकांचे ओळखपत्र घेऊन सविस्तर नोंद करून त्याचे रजिस्टर तयार करावे, केअरटेकर, पेपरवाले, वायरमन, प्लंबर व इतर यांची संपूर्ण माहिती अद्यावत करून ठेवावी त्यांचे चारित्र्य पडताळणी करून घ्यावी.

आपल्याकडे राहून देश विघातक अथवा गंभीर गुन्हे करण्यासाठी आपली आस्थापना वापरणार नाहीत याकरिता त्यांचे सर्वांचे संपूर्ण वर्णन, वाहनाचे नंबर, प्रकार आपल्याकडे नोंद असावेत, खाजगी बंगल्यात आलेल्या पर्यटकांना वेळेची मर्यादा घालून घ्यावी,सूर्यास्तानंतर स्वीमींग पुलचा वापर करण्यास देऊ नये इत्यादी अनेक मुद्यावर सविस्तर माहिती देण्यात आलेली असून तशा त्यांना लेखी नोटिसा देऊन बजावणी करण्यात आलेली आहे.

पुणे ग्रामीणचे पोलीस अधीक्षक डॉ. अभिनव देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सदर बैठकीस अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे, उपविभागीय पोलीस अधिकारी राजेंद्र पाटील, लोणावळा ग्रामीणचे पोलीस निरीक्षक प्रवीण मोरे, लोणावळा शहर पोलीस ठाण्याचे निरीक्षक सीताराम डूबल, उत्पादन शुल्क विभागाचे पोलीस उपनिरीक्षक दिपक सुपे हे उपस्थित होते.

बैठकीत अनेक नागरिकांनी पर्यटकांच्या हुल्लडबाजीमुळे इतर नागरिकांना त्रास होत असल्याच्या समस्या मांडल्या, त्यावर बोलताना अपर पोलीस अधीक्षक मितेश घट्टे यांनी पर्यटन वाढीबरोबरच पर्यटकांची सुरक्षा सर्वार्थाने आपण केली तर एक सशक्त वातावरण तयार होऊन पर्यटन स्थळ म्हणून लोणावळा व मावळ तालुक्याचा भाग अधिक सुंदर होऊ शकेल. नियमांच्या पालनाबरोबर जबाबदारीने दायित्व स्वीकारल्यास सर्वांसाठीच एक सुरक्षित वातावरण तयार होईल.

यापुढे सर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीत वरील सूचनांचे व नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करण्यात येणार आहे. ही कारवाई स्थानिक पोलीस व राज्य उत्पादन शुल्क विभाग असे संयुक्त कारवाई करण्यात येणार असल्याने अशा आस्थापना चालक, मालक यांनी नियमांचे पालन करावे असे आवाहन देखील यावेळी पोलीस प्रशासनाकडून करण्यात आले आहे.